सावकार मादनाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी महायुतीच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय होणार आहेत.  
कोल्हापूर

स्वाभिमानीचे सावकर मादनाईक यांच्यासह पदाधिकारी महायुतीबरोबर; शेट्टी यांना धक्का

Maharashtra Assembly Election : कोल्हापुरात झालेल्या बैठकीत निर्णय

दिनेश चोरगे

जयसिंगपूर, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी शिरोळ मतदारसंघात स्वाभिमानीचे उमेदवार माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारात असतानाच शनिवारी स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी महायुतीच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय होणार आहेत.

तिसर्‍या आघाडीचा पर्याय स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांना मान्य नसल्याने संघटनेत गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू आहे. सावकर मादनाईक यांनी शेट्टी यांच्या या भूमिकेला थेट विरोध दर्शवला होता.

स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राजू शेट्टी यांचा तिसरा आघाडीचा पर्याय आम्हाला मान्य नाही. महायुती सरकारने साडेसात एचपी पर्यंतच्या मोटर पंपांना वीजमाफी, 2019 ते 2025 पर्यंत पाणीपुरवठा संस्थांना वीज सवलत, उच्च दाबासाठी 1.16 पैसे आणि लघु दाबासाठी प्रति मिनीट 1.00 रुपये जाहीर केले. राज्यातील दहा लाख शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतल्यामुळे आम्ही महायुतीला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकावर सावकर मादनाईक, स्वाभिमानीचे कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, स्वाभिमानी पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके, सदस्य सतीश हेगाणा, सागर मादनाईक आदींच्या सह्या आहेत.

स्वाभिमानी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्याही त्या पत्रकावर सह्या आहेत. या दोघांनी यापूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याने त्यांना पदमुक्त केले आहे. या दोघांनी महायुतीस पाठिंबा देणे म्हणजे हास्यास्पद आहे. उर्वरीत सावकर मादनाईक यांच्यासह तीन सदस्यांनी महायुतीस दिलेल्या पाठिंब्याच्या भूमिकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचा कोणताही व कसलाही संबंध नाही. त्यांनी घेतलेला निर्णय वैयक्तिक आहे. स्वाभिमानी पक्ष हा परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सामील असल्याचे स्वाभिमानी पक्षाचे प्रधान सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT