कोल्हापूर : गावापासून दूरवरच्या शाळेत जाण्यासाठी होणारी पायपीट, वाटेतली भीती आणि त्यामुळे अर्ध्यावरच सुटणारं शिक्षण... ग्रामीण भागातील अनेक मुलींच्या नशिबी आलेलं हे चित्र आता बदलत आहे. जिल्हा परिषदेच्या ‘विद्यार्थिनी सायकल योजने’मुळे हजारो विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर झाली असून, आता त्या सायकलवरून आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेपावत आहेत. गेल्या दोन वर्षांत या योजनेमुळे जिल्ह्यातील 2,060 पेक्षा जास्त मुलींची शाळेत जाण्याची पायपीट थांबली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत 2012 पासून ‘विद्यार्थिनी सायकल योजना’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील आठवी ते बारावीमध्ये शिकणार्या मुलींना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर साधन मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खुल्या व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील तब्बल 2060 विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही प्रमुख अटी निश्चित करण्यात आल्या आहेत : विद्यार्थिनी आठवी ते बारावी इयत्तेत शिकणारी असावी. तिच्या घरापासून शाळेचे अंतर दोन किलोमीटरपेक्षा जास्त असावे. पात्र विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी थेट अनुदान दिले जाते. या निकषांची पूर्तता करणार्या मुलींची निवड करून त्यांना जिल्हा परिषदेकडून अनुदानाचे वाटप केले जाते.
सायकलने दिली शिक्षणाला नवी दिशा: पूर्वी रोज अनेक किलोमीटर चालून शाळा गाठावी लागत असे. यामुळे मुलींना थकवा येण्यासोबतच त्यांचा वेळही वाया जायचा. पावसाळ्यात तर ही पायपीट अधिकच त्रासदायक ठरायची. अनेक पालक केवळ सुरक्षिततेच्या कारणास्तव मुलींचे शिक्षण थांबवत असत, ज्यामुळे शाळांमधील मुलींची पटसंख्या घटत होती. मात्र, आता स्वतःच्या हक्काची सायकल मिळाल्याने त्यांचा वेळ वाचला आहे, शाळेत वेळेवर पोहोचणे शक्य झाले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे.
2025-26 या आगामी शैक्षणिक वर्षासाठीही या योजनेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र विद्यार्थिनींना सप्टेंबर महिन्यापर्यंत सायकलींचे वाटप पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
विद्यार्थिनी सायकल योजना ही ग्रामीण भागातील मुलींसाठी केवळ प्रवासाचे साधन नाही, तर त्यांच्या शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रभावी टप्पा आहे. या योजनेमुळे मुलींची शाळेत उपस्थिती वाढली असून, त्यांना वेळेत व सुरक्षितपणे शिक्षण घेता येत आहे.सुजित कुमार इंगवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर