Satej Patil |  
कोल्हापूर

Satej Patil | महायुतीचा अजेंडा गोकुळ मोडण्‍याचा; आमचा टिकविण्‍याचा

आ. सतेज पाटील यांचा घणाघात; अजिंक्‍यतारा कार्यालयात पॅनेलची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : महायुतीचा जाहीरनामा लांबच त्‍यांचे पॅनेल होऊ शकत नाही, इतकी मोडतोड झाली आहे. महायुतीमधील हालचाली पाहता गोकुळ मोडीत काढण्‍याचा त्‍यांचा अजेंडा असल्‍याचा घणाघात आ. सतेज पाटील यांनी केला. तसेच समविचारी आघाडीचा गोकुळ टिकविण्‍याचा अजेंडा असल्‍याचे सांगत त्‍यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे पॅनेल गुरुवारी जाहीर केले. यावेळी त्यांनी महायुतीची २५-० ची भाषा आहे. पण, आमचा शेतकर्‍यांना २५ रुपये कसा फायदा होईल यासाठी प्रयत्‍न आहे. गोकुळचे निर्णय मुंबईतून नव्हे, कोल्हापुरातूनच होतील. गोकुळमध्‍ये एकत्र येणार होता, तर त्‍या १,३०० दूध संस्‍थांना त्रास का दिला? अगोदरच मुख्‍यमंत्र्यांसोबत बैठक घेत जागावाटपाचा तिढा का सोडवला नाही, असा प्रश्‍न केला. पत्रकार परिषदेला माजी आ. सत्यजित पाटील सरुडकर, माजी आ. ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.

पी. एन. पाटील गटाने आत्‍मचिंतन करावे

स्‍व. आ. पी. एन. पाटील गटाला एकच जागा मिळणे दुर्दैवी आहे. यापूर्वी गटाला पाच ते सहा जागा मिळायच्‍या. आता एक जागा मिळण्‍याची वेळ कोणामुळे आली याचे आत्‍मचिंतन गटाने करणे आवश्‍यक असल्‍याचे आ. पाटील यांनी सांगितले.

चुयेकर पहिले चेअरमन

गोकुळवर सत्ता आल्यास शशिकांत पाटील-चुयेकर पहिले चेअरमन असतील. मागील काळात वर्षभरासाठी ते चेअरमन होणार होते. त्यासाठी फटाके आणले होते, घराच्या दारात मंडपही उभारला होता. आता सत्ता मिळाल्यास ‘‘तोच मंडप पुन्हा उभा केला जाईल आणि चुयेकर यांच्या चेअरमनपदाचे फटाके नव्याने फोडले जातील,’’ असे आ. पाटील यांनी सांगितले.

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे पॅनेल असे...

सर्वसाधारण गट : शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, प्रा. किसन चौगले, राहुल देसाई, बाबासाहेब देवकर, उदय पाटील-सडोलीकर, विश्‍वजित जाधव, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, सत्यजित पाटील, रणधीर मोरे, विश्‍वजित पाटील, भीमगोंडा बोरगावे, विशाल पाटील, विश्‍वासराव इंगवले, दादासाहेब पाटील-सातार्डेकर, विकास पाटील, सुभाष डोंगरे, शहाजी पाटील.

महिला राखीव : अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे.

इतर मागास : शशिकांत खोत.

अनुसूचित जाती : माजी आ. राजूबाबा आवळे.

भटके विमुक्त : बयाजी शेळके.

समविचारी आघाडीचा जाहीरनामा...

पाच वर्षांत ३० लाख लिटर

दूध संकलनाचे उद्दिष्ट

पशुखाद्य दर पहिल्‍याच

महिन्‍यात १०० रु. कमी करणार

जातिवंत म्‍हैस खरेदीसाठी

७५ टक्‍के अनुदान

कर्मचार्‍यांना सेवाज्‍येष्‍ठतेनुसारच पदोन्‍नती

दूध संस्‍था इमारत बांधकाम व दुरुस्‍तीसाठी अनुदान

म्‍हैस दुधाला पाच, गाय

दुधाला दोन रुपये दरवाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT