‌Gokul Dairy Election | सतेज पाटील-महाडिक सामना ‘गोकुळ’मध्ये पुन्हा रंगणार ? 
कोल्हापूर

‌Gokul Dairy Election | सतेज पाटील-महाडिक सामना ‘गोकुळ’मध्ये पुन्हा रंगणार ?

महिनाभरापूर्वी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण; आता आरोप-प्रत्यारोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कट्टर विरोधक, पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्यातील महिना-दोन महिन्यांपूर्वीच्या एकमेकांवरील विधानांनी पाटील-महाडिक एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आता त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यामुळे गत निवडणुकीत रंगलेला पाटील विरुद्ध महाडिक असाच सामना यंदाच्याही गोकुळ निवडणुकीत रंगण्याची चिन्हे आहेत.

मल्टिस्टेटच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतीने माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या ३० वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला. गोकुळमधील महाडिक यांची सत्ता उलथवून टाकत महाविकास आघाडीचा कारभार सुरू झाला. मात्र, राज्यातील परिस्थिती बदलली. मंत्री मुश्रीफ महायुतीच्या गोटात सामील झाले. मात्र, त्यांनी सहकारातील दोस्ती कायम ठेवत, गोकुळमध्ये पुढची दोन वर्षे सतेज पाटील यांच्यासोबतच काढली. मुश्रीफ यांची स्वकीयाकडूनच कोंडी होऊ लागल्यानंतर त्यांनी महायुतीची बाजू घेण्यास सुरवात केली.

गोकुळच्या निवडणुकीत प्रथमच महायुती एकत्रितपणे उतरण्याची चिन्हे दिसू लागताच, कट्टर विरोधक असलेल्या आ. पाटील आणि आ. महाडिक यांनी एकमेकांबाबत चांगली विधाने केली. यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणात नव्या जोडण्यांचे संकेत दिसू लागले, तशा चर्चाही वाढत गेल्या. मात्र, गोकुळमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचे ठाम झाले, त्यातच मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घातले. महायुतीत राहून महायुतीविरोधात जाणाऱ्यांची खैर नाही, हे जवळपास स्पष्ट झाल्याने महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली.

वार-पलटवारातून आगामी संघर्षांची झलकच

गोकुळची राजकीय समीकरणे स्पष्ट होताच, आमदार पाटील यांनी समविचारी आघाडीची घोषणा करत शड्डू ठोकला. पाटील यांना संघर्ष नवा नाही, त्यांचा अनुभवही दांडगा आहे, त्यातुनच एकत्र येण्यापर्यंत चर्चा होत राहिलेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी खा. महाडिक यांच्याविरोधात त्यांचा संघर्ष पुन्हा सुरू झाला. खा. महाडिक यांनीही आ. पाटील यांच्यावर हल्लाबोल सुरू केल्यानंतर आ. पाटीलही मागे राहिले नाहीत. दोघांनीही एकमेकांवर वार-पलटवार करताना आगामी संघर्षांची झलकच दाखवून दिली. यामुळे यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आ. पाटील आणि खा. महाडिक असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT