कोल्हापूर : नैराश्य आणि तणाव यामुळे राज्यात पोलिसांच्या आत्महत्या वाढत आहेत. 2017 मध्ये देशात मानसिक आरोग्य कायदा लागू केला आहे. पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींच्या अभ्यासक्रमातच मानसिक आरोग्य आणि समुपदेशन याचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी अधिवेशनात प्रश्नाद्वारे केली.
आमदार पाटील म्हणाले, देशात मानसिक आरोग्य कायदा लागू झाल्यानंतर त्याचवेळी पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थींच्या अभ्यासक्रमातच मानसिक आरोग्य आणि समुपदेशनासाठी काही गोष्टींचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली होती. मानसिक आरोग्य आणि समुपदेशनाचा त्यात समावेश केला नसेल, तर तो आता करावा. कर्मचार्याच्या आत्महत्येनंतर पोलीस कल्याण निधीतून दिली जाणारी 50 हजारांची मदत 1 लाखांपर्यंत करावी. पोलीस कर्मचार्याच्या कुटुंबीयांना अनुकंपा कायदा लागू करण्यात येईल काय, याबाबत गांभीर्याने विचार करा, अशा मागण्या त्यांनी प्रश्नाद्वारे मांडल्या. यावर गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.