सतेज पाटील यांनी बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक न ठेवता समोर यावे File photo
कोल्हापूर

सतेज पाटील यांनी बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक न ठेवता समोर यावे

राजू शेट्टी यांनी गगनबावड्यात शेकडो एकर जमीन कुणाच्या जीवावर घेतली?

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : माजी पालकमंत्री सतेज पाटील यांची कारकीर्द कर्तव्यशून्य राहिली आहे. राजू शेट्टी यांना तर जनतेनेच नाकारले. त्यामुळे या दोघांना आता बिनबुडाच्या टीका करण्याशिवाय कोणतेच काम नाही. वैफल्यग्रस्त होऊन ते आ. राजेश क्षीरसागर यांच्यावर प्रसद्धीपोटी खोटे आरोप करत आहेत. पाटील यांनी बगलबच्च्यांना पुढे न करता स्वत: समोर यावे. शेट्टी यांच्यासारख्या पाकीटबाबांनी विचार करून बोलावे. शेट्टी यांनी गगनबावडा तालुक्यात शेकडो एकर जमीन कुणाच्या जीवावर घेतली याचाही खुलासा त्यांनी करावा, असे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थांमधील बेहिशेबी डोनेशनच्या मिळकतीवर एका नेत्याने अनेक पाकीटबाबांना दत्तक घेतले आहे. त्यांना इतरांवर टीका करण्यासाठीच पोसले आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा ठरणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरीबांधवांचा पाठींबा मिळत असल्याने विरोधकांना पोटशूळ उठले आहे, म्हणूनच वैयक्तिक टीकेची पातळी घसरली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साडेतीन वर्षांच्या काळात आ. क्षीरसागर यांच्या माध्यमातून जिल्ह्याला कोट्यावधी निधी मिळाला. यातून अनेक विकासकामे पूर्णत्वास येतत आहेत. आ. पाटील हे आ. क्षीरसागर यांच्यावर खोटे आरोप करून दमले आहेत. त्यामुळे जुने तथ्यहीन आरोप शेट्टी या पाकीटबाबांकडून वदवून पुन्हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेट्टी यांनाही कारखानदारांशी युती केल्याने त्यांना पैशाची कावीळ झाली आहे. त्यांना सर्व ठिकाणी पैसेच दिसू लागले आहे.

महायुती सरकार विकासाचे काम करत असताना शेतकर्‍यांत गैरसमज पसरवून राजकीय पोळी लाटण्याचा डाव विरोधकांनी आणि त्यांनी पोसलेल्या बगलबच्च्यांनी सुरू केला आहे; परंतु खोटे आरोप करून संभ्रम पसरविण्याच्या त्यांच्या उद्योगाला जनतेने ओळखले आहे. येणार्‍या काळात शक्तिपीठ पूर्णत्वास येण्यासाठी उर्वरित शेतकरी स्वत:च्या सहमतीने पुढे येतील, असेही चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT