कोल्हापूर

कोल्हापूर : विरोधकच ठरला नाही तर बोलायचे कुणावर : आ. सतेज पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : विरोधकच अद्याप ठरला नसल्यामुळे बोलायचे कुणावर, असा सवाल करत आ. सतेज पाटील यांनी कोल्हापुरी बाणा वेगळा आहे. त्यामुळे कोणीतरी काही तरी सांगेल आणि त्याच्या मागे कोल्हापूरची जनता फरफटत जाईल, असे कधीच होत नाही. कोल्हापूरच्या जनतेचे स्वत:चे मत असते आणि हे मत शाहू महाराज यांच्या बाजूचेच असणार आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळच्या टॅगलाईनबद्दल विचारले असता आ. पाटील म्हणाले, महायुतीत भांडणे असल्यामुळे त्यांचा उमेदवार अजून निश्चित होत नाही. विरोधी उमेदवार ठरायला एवढा वेळ लागत असेल तर निवडणुकीचा विषय लांबच. त्यामुळे आता बोलायचे कोणाविरुद्ध असा प्रश्न असल्याने आम्ही जे चांगले करणार आहोत ते जनतेला सांगणार आहे. शाहू महाराज यांचा विकासाचा दिृष्टकोन कसा असेल तेच आम्ही सांगणार आहे. पंचगंगा प्रदूषण, बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी गती देण्यावर आमचा भर राहील. निवडणुकीचे वातावरण तापल्यानंतर टॅगलाईन हळूहळू सुरू होतीलच.

निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करणे हा लोकशाहीचा खून आहे. सामान्य माणसाला गृहीत धरून लोकशाहीचा जो गैरवापर चालला आहे त्याला जनताच उत्तर देईल, असेही पाटील म्हणाले.

विरोधकांकडून होत असलेल्या 'मान गादीला, मत मोदींना' व्हायरल पोस्टबाबत विचारले असता ते म्हणाले, त्याचा काही परिणाम होणार नाही. कोल्हापूरच्या मातीतला विषय आहे. कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहीत आहे. कोल्हापुरी बाणा वेगळा आहे. इथल्या मातीचा धर्म वेगळा, इथली संस्कृती वेगळी. दिल्लीशी लढण्याची तयारी असणारा कोल्हापूरचा बाणा आहे. कोल्हापूरच्या जनतेचे स्वत:चे मत आहे. ते मत शाहू महाराज यांच्या बाजूचेच असणार आहे.

SCROLL FOR NEXT