कोल्हापूर

‘ते’ कधीपासून भाकीत करू लागले? नाव न घेता सतेज पाटील यांचा धनंजय महाडिक यांना टोला

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ज्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही त्यांच्या मागे जनता कशी राहणार, असा सवाल करून आ. सतेज पाटील यांनी महायुतीत सामील होताना बरे वाटले, आता तिकिटासाठी त्यांच्यात मारामार्‍या लागल्याचा टोला लगावला. मला माहीत नाही ते भाकीत कधीपासून करायला लागले? भविष्य सांगायला सुरुवात केली असेल, तर माझी कुंडली घेऊन त्यांच्याकडे जावे लागेल, असा पलटवार त्यांनी महाडिक यांच्या वक्तव्यावर केला.

महायुतीमध्ये उमेदवारीबाबत अद्यापही संभ—मावस्था आहे. महायुतीत सामील होताना बरे वाटले; परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते, हे त्यांना समजले. स्वत:च्या तिकिटासाठी मारामारी करणार्‍यांच्या मागे जनता जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीचा प्रचार मात्र खूप पुढे गेला आहे. कोल्हापूरच्या जनतेचा आवाज शाहू महाराज संसदेत पोहोचवतील, असा विश्वासही आ. पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी हातकणंगलेच्या जागेबाबत आपली चर्चा झाली आहे. राजू शेट्टी आघाडीसोबत यावेत, यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आम्हीदेखील प्रयत्न करत आहोत. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये हातकणंगलेच्या जागेचा समावेश नाही. त्यामुळे अजूनही या जागेबाबत आम्ही आशावादी आहोत. या जागेबाबत महायुतीचाही उमेदवार अद्याप ठरलेला नाही. ही जागा विद्यमान खासदारांकडे राहणार की भाजपकडे जाणार, याबाबत त्यांच्यातच संभ—मावस्था आहे.

वंचित बहुजन आघाडीनेही आमच्यासोबत यावे, यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन विनंती केली आहे. अद्याप वेळ गेलेली नाही. सकारात्मक चर्चा होईल. आघाडीचे नेते आंबेडकर यांच्याशी अजूनही संपर्क साधत आहेत. यातून काही तरी चांगले घडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचा एकही उमेदवार येणार नाही, असे म्हणणारे केव्हापासून भाकीत करू लागले, असे सांगून आ. पाटील म्हणाले, भाजपने आत्मविश्वास गमावल्यामुळेच त्यांनी विरोधी पक्षाचे नेते फोडण्यास सुरुवात केली. दुप्पट मतदारसंघ असणार्‍या उत्तर प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणुका आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घेत आहेत. यावरून भाजप उसने अवसान आणत असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत तीन दिवस वाट पाहूनही खा. उदयनराजे यांची अमित शहा यांच्याशी भेट न होणे हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या गादीचा मान कोण ठेवतेय आणि कोण ठेवत नाही, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही निर्णय नाही. मात्र, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला. सातारा येथे मात्र हे होत नाही, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT