कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी महायुतीचे नेते एकवटले, तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रमाणेच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील गोकुळमध्येही एकाकीच लढा देतील. जे सोबत येतील त्यांना घेऊन आखाड्यात उतरण्याची रणनीती त्यांची आहे. त्यामुळे आ. पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसमोर महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे तगडे आव्हान असणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवार, 2 जूनपासून ठराव गोळा करण्यास सुरुवात होईल. महायुतीच्या नेत्यांनी मागील काळात झालेले वाद विसरून निवडणूक एकत्र लढविण्याचे शनिवारीच्या बैठकीत ठरवले. तर आ. सतेज पाटील यांनी यापूर्वीच आघाडीची घोषणा करत गोकुळसाठी शड्डू ठोकला. सद्यथितीत महायुती विरुद्ध आ. सतेज पाटील अशीच लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे.
‘गोकुळ’मध्येही देणार कडवी झुंज
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असले तरी आ. सतेज पाटील यांनी त्यांना कडवी झुंज दिली. गोकुळमध्येही सध्या अशाच पद्धतीने निवडणूक होईल, असे चित्र आहे. मात्र सहकारात स्थानिक संदर्भ वेगळे असल्यामुळे निवडणुकीत महायुती एकहाती गोकुळचे मैदान मारणार का, आ. पाटील पुन्हा कडवी झुंज देणार हे प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यानच स्पष्ट होईल.
बिनविरोधसाठीही यंत्रणा?
गोकुळची निवडणूक लागली तर ती सर्वांसाठीच खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही एक यंत्रणा सक्रिय आहे. आ. सतेज पाटील यांना बिनविरोधचा प्रस्ताव एका नेत्याकडून दिला होता. मात्र न्यायालयीन बाबीमुळे निवडणूक लांबणीवर पडली अन् प्रस्तावही तसाच पडून राहिला. सध्या बिनविरोधसाठी पुन्हा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. त्याला आ. पाटील कसा प्रतिसाद देणार यावर गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार का, प्रत्यक्षात मतदान होणार हे ठरणार आहे.