Gokul Dairy  File Photo
कोल्हापूर

kolhapur | महायुतीची सत्तेची खेळी; बहुमत असलेल्या समविचारीवर भारी!

गोकुळमध्‍ये बहुमत मिळूनही आ. सतेज पाटील सत्तेपासून दूर

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्‍हापूर : सहकाराच्‍या राजकारणात संख्‍याबळ महत्त्‍वाचे की सत्तेची रणनीती, याचा प्रत्‍यय गोकुळ अध्‍यक्ष निवडीतून आला. बहुमत मिळूनही आ. सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले. शासन नियुक्‍त संचालक नियुक्‍तीचा डाव टाकत महायुती नेत्‍यांनी गोकुळवर वर्चस्‍व मिळवले. मात्र त्‍यांची ही खेळी जनतेला कितपत रुचली हे आता २०२९ च्‍या विधानसभा निवडणुकीत स्‍पष्‍ट होईल. गोकुळच्‍या सत्तासंघर्षात मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक आणि आ. सतेज पाटील यांच्‍या झालेल्‍या आरोप-प्रत्‍यारोपांचे पडसाद २०२९ मध्‍ये नक्‍कीच उमटतील. अध्‍यक्ष निवडीतील घडामोडींमुळे जिल्‍ह्याच्‍या राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

या निवडीने जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा, आघाड्यांची ताकद, सत्तेची समीकरणे आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती अशा अनेक मुद्द्यांना एकाच वेळी हात घातला आहे. शासनाच्या निर्णयांचे महत्त्व किती निर्णायक ठरू शकते, याचे उदाहरण देणारी गोकुळची निवडणुक ठरली आहे.

गोकुळमधील सत्तासंघर्षाचा सर्वाधिक महत्त्वाचा राजकीय पैलू म्हणजे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयार होणारी नवी समीकरणे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय स्पर्धा यापूर्वीही राहिली आहे. मात्र, गोकुळच्या निमित्ताने या संघर्षाला सहकार क्षेत्राची जोड मिळाली आहे. गोकुळची निवडणूक २०२९ च्‍या विधानसभा निवडणुकीत कोणासाठी आव्‍हानात्‍मक ठरणार याची चर्चा सध्‍या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

देर है पर दुरुस्‍त है

मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर ‘देर है पर दुरुस्‍त है’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळ निवडणुकीपूर्वी दूध संस्‍थांवरून महायुतीमध्‍येच अंतर्गत वाद सुरू होता. या वादाचा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. यामधून महायुती नेत्‍यांनी मतदारांना गृहीत धरता येत नाही याचा धडा शिकला. यानंतर अध्‍यक्षपद निवडणुकीत महायुती नेत्‍यांमध्‍ये एकजूट दिसली. मात्र वेळाने आलेली एकजूट पुढील काळात टिकणार का, असाही प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

आगामी राजकारणावर अनेक प्रश्‍न...

गोकुळची निवडणूक महायुतीमधील एकजूट किती टिकणार? गोकुळच्या सत्तेसाठी एकत्र आलेले नेते विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रश्‍नावरही एकत्र राहणार का? आ. सतेज पाटील यांची पुढील रणनीती काय असेल? गोकुळच्या सत्तेपासून दूर राहिल्यानंतर ते सहकार क्षेत्रातील आपली पकड कायम ठेवण्यासाठी कोणती राजकीय भूमिका घेतात? स्थानिक नेत्यांचे राजकीय संबंध कसे बदलणार? मुश्रीफ, महाडिक, चंद्रकांत पाटील, आबिटकर आणि सतेज पाटील यांच्यातील संघर्ष आगामी राजकीय निर्णयांवर कसा प्रभाव टाकतो... असे अनेक प्रश्‍न उपस्‍थित करणारी ठरली आहे.

गोकुळ अध्‍यक्ष निवड घटनाक्रम

स. १० वाजता : निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले गोकुळमध्‍ये दाखल.

स. १०.०५ : शासन नियुक्‍त संचालक पोलिस बंदोबस्‍तात गोकुळमध्‍ये आले.

स. १०.३० : समविचारीचे १३ संचालक अध्‍यक्ष निवड सभेस उपस्‍थित

स. १०.३५ : महायुतीचे संचालक पिवळे फेटे परिधान करून गोकुळमध्‍ये हजर

स.११.०० : अध्‍यासी अधिकारी मौसमी चौगुलेंकडून अध्‍यक्ष निवड प्रक्रियेस सुरुवात

स. ११.१५ : उमेदवारी अर्जाचे वितरण

स.११.४५ : उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची वेळ संपली.

स. ११.५० उमेदवारी अर्जांची छाननी

दु. १२.२५ : उमेदवारांची यादी प्रसिद्ध, अध्‍यक्षपदासाठी माजी आ. राजेश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर यांचेच अर्ज

दु. १२.५५ : उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची मुदत संपली.

दु.१.१० : अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध.

दु.१.२५ : मतदान प्रक्रियेला सुरुवात.

दु. २.०० : मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

दु. २.१२ : संचालकांच्‍या मतदानात चुयेकरांना १३, राजेश पाटील यांना १२ मते मिळाली.

दु. २.१५ : शासन नियुक्‍त चार संचालकांची मते मोजली.

दु २.३० : राजेश पाटील यांना १६ तर शशिकांत पाटील-चुयेकर यांना १३ मते

दु. २.३५ : निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून माजी आ. राजेश पाटील यांची अध्‍यक्षपदी निवड झाल्‍याचे घोषित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT