कोल्हापूर : शपथा मोडल्या तर तुम्हाला आजार होईल, असे वक्तव्य महायुतीचा एक माजी आमदार करत आहे. त्यांचे हे वक्तव्य पुरोगामी कोल्हापूरसाठी दुर्देवी असल्याचा आरोप आ. सतेज पाटील यांनी केला. तीस वर्षे जे तुमच्यासोबत आहेत. त्यांना शपथा घ्यायला सांगत महायुती ठरावधारकांवर अविश्वास दाखवत आहे. सहा महिने वैर असणारे गोकुळ चालवू शकणार नाहीत. समविचारी आघाडीच एक़मुखी कारभार करेल याचा विश्वास असल्याने ठरावधारक नक्कीच कौल देतील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
आ. पाटील म्हणाले, महायुतीचे नेते मतदानादिवशीही ठरावधारकांना शपथा घ्यायला लावत आहेत. शपथा घालून ठरावधारकांना भीती घालणे हा प्रकार कितपत योग्य आहे. भीती घालून सत्ता मिळवायची आणि नंतर गोकुळ गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल केंद्राच्या घशात घालण्याचा डाव आहे. मात्र, आम्ही तसे करू देणार नाही. महायुतीचा एकही नेता सरदार वल्लभभाई पटेल केंद्राबाबत वक्तव्य करत नाही. यावरून त्यांचा अजेंडा स्पष्ट होत आहे.
महायुती गोकुळ काय चालवणार
महायुतीमधील भांडणं संपूर्ण जिल्ह्याने पाहिली आहेत. सहा महिने एकमेकांचे वैरी असलेले आता एकत्र आले आहेत. महायुतीची नऊ तोंड आहेत. त्यामुळे एकत्रित ते गोकुळ चालवूच शकणार नाहीत. माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे मागील निवडणुकीत सतेज पाटील यांनी आमच्याकडून शपथा घेतल्या असे म्हणत असतील, तर त्यांनी त्या संदर्भातील व्हिडीओ प्रसारित करावेत. त्यांनी जर शपथ घेतली होती, तर पाच वर्षे आमच्यासोबत थांबायला पाहिजे होते. ते आम्हाला मध्येच सोडून का गेले. ठरावधारकांचा कौल नक्कीच समविचारी आघाडीला मिळेल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.