कोल्हापूर : डेव्हलपमेंट प्लॅनमधून कोल्हापूर शहराचा विकास होणे आवश्यक होते. परंतु, 1998 ला झालेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमधून काँग््रेासचे आ. सतेज पाटील यांनी कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल बांधून स्वतःचा विकास केला. जनतेला रस्ते, उद्यान, क्रीडांगणसह इतर मूलभूत सोयीसुविधा न देता वाऱ्यावर सोडले, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
दहा म्युझिक फाऊंटन उभारण्याचे आव्हान
रंकाळा तलावात अत्याधुनिक म्युझिक फाऊंटन (संगीत कारंजा) उभारण्यासाठी शासनाकडून 5 कोटी रु. निधी मंजूर करून आणला आहे. महापालिकेने वर्कऑर्डर दिली असून, लवकरच काम सुरू होईल. त्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढेल. परंतु, आ. पाटील यांनी म्युझिक फाऊंटन फक्त 55 लाखांत होते असे खोटे सांगत आहेत. तसे असेल तर पाच कोटी निधीतून त्यांनी दहा म्युझिक फाऊंटन बांधून दाखवावेत, असे आव्हानही आ. क्षीरसागर यांनी दिले.
थेट पाईपलाईनमध्ये 70 कोटींचा ढपला
आ. क्षीरसागर म्हणाले, आ. पाटील यांनी आय.आर.बी. रस्ते प्रकल्प आणून कोल्हापूरवर अन्याय केला. त्यानंतर टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळले. विधानसभेच्या दारात मी बेमुदत उपोषण केल्यानंतर थेट पाईपलाईनला मंजुरी मिळाली. मात्र, त्याचे श्रेय पाटील यांनी घेतले. तसेच थेट पाईपलाईनमध्ये पाटील यांनी 70 कोटींचा ढपला पाडल्याचा आरोप त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी केला होता. पाटील यांनी अभ्यंगस्नान केल्यानंतर थेट पाईपलाईनचा पाणी पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. अजूनही शहरवासीयांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत. पत्रकार परिषदेला माजी आ. जयश्री जाधव व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बालुगडे उपस्थित होते.