कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी टोकण दिल्याचा आरोप महादेवराव महाडिक यांनी करणे हा मोठा विनोदच आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पैशाचे राजकारण कोणी आणले हे महाडिक यांनी तपासावे. धनंजय महाडिक यांना प्रथम खासदार करण्यात हसन मुश्रीफ यांचा सिंहाचा वाटा होता. तेच आता मुश्रीफ यांच्याविरुद्ध एकत्र असतानाही बोलत आहेत, हे दुर्दैवी आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गोकुळच्या निवडणुकीला अजून वर्ष आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत झालेली महायुती नैसर्गिक युती नाही. त्यामुळे त्यांचा संसार कसा आहे ते लवकर या निवडणुकीत दिसेल, असे सांगून गोकुळबद्दल बोलताना पाटील म्हणाले, महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुकीत टोकण दिल्याचा मुश्रीफ यांच्यावर केलेला आरोप एक विनोदच आहे. त्यांनी आजपर्यंत कसे राजकारण केले हे सर्वांना माहीत आहे.
पूर्वी जिल्ह्यात संघटनात्मक ताकद, पक्षीय राजकारण सर्व ठिकाणी होते. त्याच्या उलट जिल्ह्याच्या राजकारणात जे झाले ते त्यांच्या कार्यकालातच झाले आहे. पक्षीय राजकारणाला खीळ कोणी घातली? पैशाचे राजकारण या जिल्ह्यात कोणी प्रथम आणले हे त्यांनी तपासावे. गोकुळची व्याप्ती वाढली आहे. उलाढाल चार हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे कामकाजात अधिक सुलभता यावी म्हणून सहकार कायद्यानुसार संचालक संख्या वाढविण्याचा निर्णय, असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
शक्तिपीठ समर्थनासाठी क्षीरसागर व पाटील यांच्या डोक्यावर बंदूक शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील बारा जिल्ह्यातून विरोध आहे. आमदार रोजश क्षीरसागर व आमदार शिवाजी पाटील यांना वरून आदेश आला असेल, त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली असेल समर्थनार्थ आंदोलन करा म्हणून. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे, असे आमदार पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राजेश पाटील यांच्याशी आपण बोललो. त्यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले. आ. चंद्रदीप नरके महायुतीमध्ये असल्यामुळे राहुल पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात जाऊन काय राजकीय फायदा होणार आहे? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ, बाळासाहेब थोरात देखील त्यांच्याशी बोलले आहेत. मंगळवारी (दि. 22) राजेश आणि राहुल पाटील दोघे भेटणार आहेत. त्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे पाटील म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. विशेषत: करवीर, चंदगड आणि आजरा तालुक्यातील मतदारसंघ करताना अनेक ठिकाणी भौगोलिक संलग्नता राखण्यात आली नसल्याचे दिसते. हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडील दोन गावे अलीकडे जोडण्यात आली आहेत. यावर हरकीत घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.