कोल्हापूर : गोकुळच्या मागील निवडणुकीत आम्ही व आ. सतेज पाटील एकत्र होतो. त्यावेळीही आ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या एका शाळेत शपथा घेतल्या होत्या. त्याचे व्हिडीओ आता उपलब्ध नाहीत. मात्र, शपथा झाल्या होत्या का नाही, याबाबत त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ मतदान प्रक्रियेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. पाटील यांना दिले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आ. सतेज पाटील शपथांवरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये मतभेद होतात. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महायुतीमधील सर्व भांडणे मिटली आहेत. महायुती म्हणजे फेव्हिकॉल का जोड झाली आहे. निवडणुकीत महायुतीची छ. शाहू शेतकरी विकास आघाडी विजयी झाली आहे. आता केवळ गुलाल उधळायचा बाकी आहे. गोकुळ कोल्हापूरच्या मातीत मोठा झाला आहे. तो कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचाच राहील. सरदार वल्लभभाई पटेल केंद्राच्या दावणीला गोकुळ बांधणार असे सांगत दूध उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.
ते नुसतंच बोलतात, पुरावे देत नाहीत : खा. महाडिक
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गोकुळ निवडणुकीत सभासदांनीच आम्हाला आणाभाका दिल्या आहेत. पण आ. सतेज पाटील शपथांवरून जे बोलत आहेत, त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत का? ईव्हीएम, एसआयआरबाबतही ते आरोप करतात. त्यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात राष्ट्रपतींची भेट घेतली. पण अद्याप पुरावे सादर केलेले नाहीत.
घट्ट सिमेंट, काँक्रीटमध्ये उभे
आ. सतेज पाटील यांनी महायुतीच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते शपथा घेत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला मंत्री मुश्रीफ यांनी मतमोजणी दरम्यान त्यांना आम्ही घट्ट सिमेंट काँक्रीटमध्ये उभे असल्याचे लक्षात येईल, असे प्रत्युत्तर दिले.