कोल्हापूर : राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार असलेल्या 22 विधानसभा मतदार संघांत दोन नंबरची मते मिळविलेल्या उमेदवारांना भाजपने पक्षप्रवेश दिला आहे. यावरून 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळाचा नारा देणार, हे निश्चित आहे. फरफट सुरू असल्याचे लक्षात येऊनही शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमध्ये थांबून असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार पाटील म्हणाले, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गृह खात्यासाठी स्वतंत्र मंत्री पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडेच हे खाते आहे. ते त्यांच्या व्यापामधून या खात्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे स्वतंत्रपणे गृहमंत्री येत नाही तोपर्यंत राज्यातील कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न कायम राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
मॅपिंग प्रक्रियेला मुदतवाढ द्या
राज्यात सुरू असलेली मतदार मॅपिंग प्रक्रिया किचकट आहे. ही प्रक्रिया एकट्या बीएलओकडून दिलेल्या मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे मॅपिंगला सरकारने किमान एक महिना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. ठेकेदार बिल मिळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विविध योजनांचे अनुदान प्रलंबित आहे. भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल का नाही, अशी परिस्थिती असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
सत्याच्या बाजूने उतरणाऱ्यांवर लाठीमार
सत्याच्या बाजूने उतरणाऱ्यांवर सरकारकडून लाठीमार केला जात आहे. अंतरावली सराटी येथून जनतेवर लाठीमार करण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली. ती आज पुण्यातील घटनेपर्यंत सुरू असल्याचा हल्लाबोल आमदार पाटील यांनी केला.