कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील संभाजीनगरातील चार ते पाच एकर जागा सुमारे 500 कोटी रुपये किमतीची असून, ती आमदार विनय कोरे यांना अवघ्या 30 कोटी रुपयांमध्ये देण्यात आली आहे. हीच जागा वाचवण्यासाठी जनसुराज्यशक्तीने महापालिका निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे, असा गंभीर आरोप काँग््रेासचे विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी रविवारी केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 19 व 20 मध्ये आयोजित केलेल्या एका कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांनी जनसुराज्यशक्ती ही काँग््रेासची मते खाण्यासाठीच उभी करण्यात आल्याचाही आरोप केला.
आमदार पाटील म्हणाले, चार ते पाच एकर जागेवर अनेकांचा डोळा होता. ही जागा कुणालाही देणार नाही, अशी ठाम भूमिका मी घेतली होती. त्या ठिकाणी केशवराव भोसले नाट्यगृहासारखे आणखी एखादे नाट्यगृह किंवा मैदान उभारण्याचा माझा विचार होता. ही जागा सार्वजनिक वापरासाठीच राहिली पाहिजे, अशी आमची भूमिका होती.
आमचे सरकार असताना कुणाचेही काही चालले नाही. मात्र, सरकार बदलताच तातडीने ही 500 कोटी रुपयांची जागा आ. कोरे यांना केवळ 30 कोटी रुपयांत देण्यात आली. त्यामुळेच ही जागा वाचवण्यासाठी जनसुराज्यने निवडणुकीत पॅनेल उभे केले असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला.
बळकावलेल्या जागा काढून घ्याव्या लागतील
या जागेबाबत निर्णय होत असताना मी महापालिका आयुक्तांना ही जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे स्पष्टपणे सांगितले होते. सध्या महापालिकेकडे जागेची कमतरता आहे. भविष्यात किमान सात हजार वाहनांसाठी बहुमजली पार्किंग उभारण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही. म्हणूनच ज्या सरकारी जागा आहेत, त्या महापालिकेकडेच राहिल्या पाहिजेत, ही आमची ठाम भूमिका आहे. ज्या जागा बळकावण्यात आल्या आहेत, त्या काढून घ्याव्याच लागतील, असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला.