आजरा : येथे शेतकर्‍यांच्या निर्धार मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील. सोबत राजू शेट्टी, संपत देसाई, अंजना रेडेकर, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, तानाजी देसाई आदी.  
कोल्हापूर

Shaktipeeth project controversy | ‘शक्तिपीठ’साठी एजंटांना 10 टक्के कमिशन; आ. सतेज पाटील यांचा आरोप

आजर्‍यातील निर्धार मेळाव्यात एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

आजरा : शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास सोडा. चांगल्या कामाला पैसे लावा. आयुष्यातून शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. पैसा मिळवणे हा एकच उद्देश शासनाचा असून, शेतकर्‍यांना राजी करण्यासाठी एजंटांना 10 टक्के कमिशनवर नेमले आहे. त्यासाठी 1 हजार तरुणांची टीम तयार केली असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे गटनेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी केला. आजरा येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकर्‍यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, आमची भूमिका विकासाच्या विरोधात नाही, गरज नसलेला महामार्ग कशासाठी? यामध्ये भ—ष्टाचार ठेकेदारांच्या माध्यमातून होणार आहे. एकदा जमीन गेली, तर परत येणार नाही.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा एक्स्प्रेस महामार्ग आहे. तो आजरा, चंदगडच्या द़ृष्टीने उपयोगाचा नाही. महामार्गामुळे महापूर येणार आहे. हा महामार्ग पूर्णपणे अव्यवहार्य आहे. स्वाभिमानी संघटनेचे तानाजी देसाई, माजी आमदार राजेश पाटील, जि. प. सदस्य सुधीर देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, मुकुंदराव देसाई, चंदगडचे सभापती विलास नाईक, कॉ. सम—ाट मोरे, राजेंद्र गड्ड्याण्णावर, गिरीश फोंडे यांची भाषणे झाली. कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी, अशोक तर्डेकर, संजय सावंत, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.

आ. शिवाजी पाटील यांनी रेल्वेसाठी प्रयत्न करावेत

आ. शिवाजी पाटील यांनी ‘शक्तिपीठ’ऐवजी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सुधीर देसाई यांनी केले. ‘शक्तिपीठ’साठीच खरात याने जमीन घेतल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या पोटावर नांगर फिरवल्याची टीका माजी आमदार राजेश पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT