कोल्हापूर : सातारा-कोल्हापूर डेमू रेल्वेचा शुक्रवारीही पुन्हा खेळखंडोबा झाला. सातार्याहून सुटलेली ही गाडी बंद पडली. परिणामी वेळेवर ही गाडी न आल्याने शेकडो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मिळेल त्या वाहनाने अनेकांनी कोल्हापूर गाठले. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकात याबाबत तक्रारही नोंद केली.
सातारा, सांगली जिल्ह्यासह जयसिंगपूर, हातकणंगले परिसरातून कोल्हापुरात येणार्या नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिकांसाठी सातारा-कोल्हापूर डेमू ही पॅसेंजर रेल्वे महत्त्वाची आहे. सातार्यातून पहाटे साडेपाच वाजता सुटणारी ही गाडी कोल्हापुरात 9 वाजून 40 मिनिटांनी येते. यामुळे या गाडीला प्रचंड गर्दी असते. मात्र या गाडीच्या वेळेबाबत प्रचंड तक्रारी आहेत. अपवाद वगळता ही गाडी कधीही वेळेवर येत नाही. यामुळे नोकरदार तसेच विद्यार्थ्यांना लेटमार्कचा फटका बसतो.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील डेमू बंद पडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यामुळे ही गाडी दहा-पंधरा मिनिटे नव्हे, तर तीन-चार तासाहूनही अधिक काळ उशिराने धावत आहे. आठ दिवसांपूर्वीच याच मार्गावर गाडी बंद पडल्याने तब्बल चार तास उशिराने आली होती. आज शुक्रवारीही ही गाडी बंद पडली. या गाडीला दोन इंजिन लावून दुपारी कोल्हापुरात आणण्यात आले.
दरम्यान, डेमू वेळेत न आल्याने अनेकांनी मिळेल ती वाहने पकडून कोल्हापूर गाठले. यासाठी अनेक प्रवाशांना मोठी दमछाक करावी लागली. उर्वरित प्रवासी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसने आले. या गाडीला हातकणंगले, रुकडी, गांधीनगर या स्थानकावर थांबा नाही. मात्र, डेमू बंद पडल्याने आज तात्पुरता थांबा देण्यात आला होता.