Satara-Kagal Highway Widening Works issue
वाघवाडी, नेर्ले आणि कासेगाव येथील प्रदीर्घकाळ रेंगाळत पडलेली उड्डाणपुलांची कामे. Pudhari File Photo
कोल्हापूर

प्रकल्पांची किंमत वाढविण्यासाठीच विलंब?

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : सातारा-कागल महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला मुद्दामहून विलंब लावून कालांतराने या कामाची किंमत वाढवून घेण्याचा ठेकेदार कंपन्यांचा डाव असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यासाठीच राष्ट्रीय आणि राज्य रस्ते विकास विभागाचे अधिकारी या कामाच्या दिरंगाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

मार्च 2022 मध्ये मंजुरी!

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने या कामाला मार्च 2022 मध्ये मंजुरी दिली. दोन टप्प्यांत हे काम करण्याचे या मंजुरीवेळीच निश्चित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने या कामाच्या सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका या 67 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यासाठी जीएसटीसह 2,127.74 कोटी रुपये खर्च निश्चित केला होता; तर पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या 63 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 2,350.41 कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला होता. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी एका बांधकाम कंपनी समूहाची 1,895 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती; तर दुसर्‍या टप्प्यासाठी सोल्युशन रोडवेज पुणे या कंपनीची 1,502 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आलेली आहे.

कमी खर्चाच्या निविदा!

एका बांधकाम कंपनी समूहाची निविदा केंद्राने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा 232.74 कोटी रुपये कमी खर्चाची आहे; तर सोल्युशन रोडवेजची निविदा 848.41 कोटी रुपये कमी खर्चाची आहे. यावरून शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा कमी खर्चात या महामार्गाच्या रुंदीकरणाची हमी या कंपन्यांनी घेतलेली आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी 2025 आहे. मात्र, सध्या सुरू असलेले काम, कामाची गती आणि प्रलंबित कामे पूर्ण व्हायला आणखी किमान दोन-चार वर्षांचा कालावधी लागू शकतो, असा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचा अर्थ संबंधित ठेकेदार कंपन्या निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करू शकणार नाहीत, हे उघड आहे.

परंपरागत फंडा!

अनेकवेळा शासकीय कामे निर्धारित किमतीपेक्षा कमी किमतीत घ्यायची, या कामांना कारण-विनाकारणपणे ठेकेदार कंपन्यांनी विलंब लावायचा, प्रदीर्घकाळ कामे रेंगाळत ठेवायची आणि कालांतराने याच कामासाठी शासनाकडून वाढीव खर्च आणि कालावधी मिळवायचा, असे प्रकार सर्रासपणे होताना दिसतात. शासकीय कामे करणार्‍या अनेक ठेकेदारांनी ही परंपरा कसोशीने पाळलेली दिसते. राज्यातील काही रस्ते प्रकल्प, धरणांची व कालव्यांची कामे ही याची जिवंत उदाहरणे आहेत. सातारा-कागल महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामातही तीच लक्षणे दिसू लागली आहेत. कारण, कामाची मुदत संपायला केवळ सहा महिने शिल्ल्लक असताना अजून निम्मेअर्धेही काम झालेले नाही आणि रस्ते विकास प्राधिकरणाचे अधिकारी मात्र ठेकेदार कंपन्यांच्या या दिरंगाईबद्दल मूग गिळून गप्प आहेत.

शासनाचेही दुर्लक्ष!

या महामार्गाच्या रुंदीकरणाला होत असलेला विलंब, ठेकेदारांचा वेळकाढूपणा, रुंदीकरणाच्या कामामुळे या महामार्गावरील वाहतुकीचा झालेला बट्ट्याबोळ, सेवा रस्त्यांची झालेली दुर्दशा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढलेले अपघात, याबाबत अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत, शासन आणि प्रशासनाकडे तक्रारी झाल्या आहेत; पण कधीही संबंधित ठेकेदार कंपन्यांना समज दिल्याचे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. याचा अर्थ शासन आणि प्रशासनाचेही ठेकेदारांच्या या दिरंगाईला पाठबळ मिळत असल्याचे दिसत आहे.

विलंबाचा भुर्दंड!

या कामाला लागत असलेल्या विलंबाचा भुर्दंड शेवटी या महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांनाच सोसावा लागणार आहे. ठेकेदार कंपन्या एकीकडे मालाच्या किमती वाढल्याच्या कारणावरून शासनाकडून जादा खर्चाला मंजुरी मिळविणार आणि दुसरीकडे या जादा खर्चाच्या वसुलीसाठी पुन्हा टोलचा कालावधीही वाढवून घेणार, म्हणजे ठेकेदार कंपन्यांची दुहेरी चांदी होणार आणि वाहनधारकांची मात्र दुहेरी लूट होणार! त्यामुळे या महामार्गावरील गावे आणि या महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांमधूनच या कामाच्या दिरंगाईबद्दल उठाव होण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय या कामाला गती मिळणार नाही.

सातारा-कागल महामार्गावरील अपघाताचा हा घ्या पुरावा!

सातारा-कागल महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असून, या मार्गावर अपघात ही नित्याची बाब झाली असल्याचे दै. ‘पुढारी’ने आपल्या वृत्तमालिकेमध्ये नमूद केले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीलाच गुरुवारी या मार्गावरून प्रवास करताना याचा प्रत्यय आला. कामेरी गावानजीक एक मोटारसायकल आणि रिक्षाची धडक होऊन त्यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला, त्याच्या हाताला मोठी जखम झाली होती. सातारा-कागल मार्गावरून प्रवास करताना रोजच्या रोज असे छोटे-मोठे अपघात पाहायला मिळत असतात.

SCROLL FOR NEXT