सरवडे : सरवडे येथील कुमार व कन्या विद्यामंदिर मराठी शाळेत ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जाळून नष्ट केल्या. तसेच साधारण तीन हजार रुपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्याध्यापिका श्वेता विष्णू काणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २९) शाळा सुटल्यावर सर्व वर्ग व कार्यालय कुलूपबंद करून घरी परतल्यानंतर आज (सोमवार, दि. १ डिसेंबर) सकाळी साडेनऊ वाजता शाळेत आल्यानंतर मुख्य गेटजवळ जळालेल्या कागदांचे अवशेष आढळले. पुढे गेट उघडून तपासणी केली असता. शाळेची चार कुलपे फोडलेली, कार्यालयीन खोलीचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न, दारासमोर उत्तरपत्रिका जाळलेल्या, तसेच एका वर्गातून विद्यार्थ्यांनी सहलीसाठी जमा केलेले सुमारे ₹३ हजार चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
शाळेतील सीसीटीव्हीमध्ये एक संशयित व्यक्ती मध्यरात्री परिसरात फिरताना दिसून येत असून तो मनोविकृत किंवा व्यावसायिक चोरटा असावा, असा प्राथमिक अंदाज शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच रणधीरसिंह मोरे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन आणि सरवडे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.
सहाय्यक फौजदार निकाडे यांनी, “आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल,” असा विश्वास व्यक्त केला. शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, “घटना अत्यंत गंभीर असून प्रशासनिक कागदपत्रे सुरक्षित राहिली, ही दिलासादायक बाब आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व जमा केलेल्या रकमेची नासधूस हा गंभीर गुन्हा आहे.” या घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला असून अधिक प्रकाशयोजना, अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे व रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
सीसीटीव्हीमध्ये दिसणारी संशयित व्यक्ती कोणाला ओळखल्यास तात्काळ ग्रामपंचायत किंवा शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच रणधीरसिंह मोरे यांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास सरवडे पोलिसांकडून सुरू आहे.