सरवडे : येथील राधानगरी–निपाणी रोडवर असलेल्या सरवडे महालक्ष्मी मॉल या प्लास्टिक व संसारोपयोगी साहित्याच्या दुकानाला सुमारे साडेआठच्या सुमारास शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. मुख्य रस्त्यावर असल्याने काही स्थानिक व्यापाराचे लक्ष जाताच त्यांनी तात्काळ अग्निशमन बंबास पाचारण केले.परंतु इतके आगीने रौद्ररूप धारण केले होते की आगीत मॉलमधील सर्व साहित्य जळून राख झाले होते.फक्त मॉलचा काळवंडलेल्या भिंतीच दिसत होत्या.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राधानगरी -निपाणी मुख्य रस्त्यावर सरवडे येथे निलेश आनंदा पाटील (बेले) यांचे हे महालक्ष्मी गृहोपयोगी प्लास्टिक साहित्यांचा मोठा मॉल आहे.रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान आग लागल्याचे काही स्थानिक व्यापार्यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ अग्निशमन बंबास पाचारण केले. परंतू अर्ध्या तासात आगीने रौद्ररूप धारण केले होते. बिद्री साखर कारखाना, भोगावती साखर कारखाना व मुरगुड नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मॉलमधील साहित्याची जळून राख झाली असून, प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. प्लास्टिक व ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने ज्वाळा वेगाने पसरल्या. शर्थीचे प्रयत्न करूनही दुकानातील सर्व माल आगीत भस्मसात झाला असून मॉलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राधानगरी - निपाणी या मुख्य मार्गावरील व्यापारी पेठेत मॉलला आग लागल्याने वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.त्यामुळे गावातील व्यापारी , तरुण मंडळे व नागरिकांनी बचावकार्य करण्यास मोठे अडथळे दूर करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.यामुळे सुदैवाने इतर व्यापारांना कोणताही धोका झाला नाही.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.बचावकार्यासाठी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राधानगरी -निपाणी मार्गावरील सरवडे ही राधानगरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून येथे विविध व्यवसाय आणि उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. या पार्श्वभूमीवर सरवडे येथे स्वतंत्र अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्युत यंत्रणांची तपासणी व सुरक्षाविषयक उपाय अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.