कोल्हापूर

Kolhapur Superstition News | सरूड-शिंपे मार्गावर 'करणी'चा प्रकार; लिंबू, नारळ आणि हळद-कुंकवाचा सडा पाहून दहशतीचे वातावरण

मतदारांमध्ये संभ्रम, भीती पसरवण्याच्या संशयाने परिसरात खळबळ...

पुढारी वृत्तसेवा

सरूड : जिल्हाभरात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना शाहूवाडी तालुक्यातील सरूड तसेच शिंपे मार्गावरील वरणा कालवा (कॅनॉल) परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना उजेडात आली आहे. समाज माध्यमावर घटनेचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरूड गावाच्या हद्दीत शिंपे मार्गावरील कॅनॉल रस्त्यावर हळद-कुंकूने माखलेले पाच-सात दगड, चिरलेले लिंबू आणि नारळाची विखूरलेली भकले हे अघोरी चित्र जनसामान्यांमध्ये भीतीबरोबरच कुतूहल निर्माण करणारे ठरले आहे. विज्ञान युगाच्या वाटचालीस अव्हेरणारा हा एकूण प्रकार बुधवारी (ता.४) रात्री घडला आहे.

शाहूवाडी तालुक्याला जादूटोणा, मंत्र-तंत्र, भानामतीचे प्रकार नवीन नाहीत. विशेषत: निवडणूक काळात असले प्रकार सर्रास घडताना दिसतात. त्यातलाच हा निंदनीय प्रकार असून मतदारांमध्ये संभ्रम, भीती पसरवणाऱ्या आणि लोकशाही प्रक्रियेत खोडा घालणाऱ्यांनी हा अघोरी प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याची नागरिकांमध्ये दिवसभर चर्चा सुरु होती.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कॅनॉल परिसरात करणी करण्यासाठी थांबलेल्या संशयित लोकांच्या चारचाकी वाहनाचा काही अंतर केलेला पाठलाग अयशस्वी ठरला. त्यामुळे उलटसुलट चर्चेला तोंड फुटल्याचे चित्र आहे. निवडणुकीत आपल्याला मतदार वश व्हावेत किंबहुना विजय मिळण्यासाठी किंवा विरोधकांचे नुकसान व्हावे या अंधविश्वासातून अशा गैरकृत्यांचा अवलंब केला जात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

सदर घटनेनंतर सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यावर स्वाभाविकपणे जनमाणसात पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. शिवाय संशयितांच्या हालचाली केंद्रित झाल्यामुळे उमेदवार समर्थक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हायटेक प्रचाराच्या माध्यमातून उमेदवार आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या अंधश्रद्धा पोषक घटनांमुळे मतदार नागरिकांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

लोकशाहीमध्ये अंधश्रद्धेला अजिबात स्थान नाही. मात्र, जादूटोणा विरोधी कायाद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळे अशा अनुचित घटनांमध्ये वाढ झाल्याचे मान्यच करावे लागेल. अशावेळी मतदारांनीही अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करून विवेकबुद्धीला अनुसरून मतदान करावे, असा सूरही सुज्ञ मतदारांमधून आळवला जात आहे. निवडणुका म्हणजे विकास आणि जनतेच्या हिताचे धोरण निवडण्याची संधी असते. त्यामुळे अशा अघोरी प्रकारांना समाजात थारा मिळू नये, अशी तीव्र भावनाही परिसरातून व्यक्त होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT