कोल्हापूर

कोल्हापूर : सारथी, बार्टी, महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित

Arun Patil

कोल्हापूर : सारथी, बार्टी, महाज्योतीच्या वतीने पीएच.डी. संशोधनासाठी देण्यात येणारी फेलोशिप यंदा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. आधी पेपरफुटी व नंतर आचारसंहिता याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार असून आर्थिक अडचणीत भर पडली आहे.

2023 च्या बॅचला सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून मिळावी, यासाठी राज्यभर आंदोलने झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकदाही फेलोशिपचा विषय चर्चेला आला नाही. उलट राज्य सरकारने हट्टाने दोनवेळा परीक्षा घेतली. पहिल्यांदा 2019 चा पेपर जसाच्या तसा दिला. दुसर्‍यावेळी सीलबंद नसलेल्या झेरॉक्स प्रती प्रश्नपत्रिका म्हणून दिल्या गेल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागास दोन्हीवेळी परीक्षा घेण्यात अपयश आले आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीस स्थगिती दिली.

राज्य सरकारकडे यासंदर्भातील चौकशी अहवाल सादर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध विषयांवर निर्णय झाले. परंतु पीएचडीच्या फेलोशिपसंदर्भात तोडगा निघाला नाही. विद्यापीठ नोंदणी होऊन दोन वर्षे उलटले तरी फिलोशिप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे संशोधन करायचे की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. सारथी, बार्टी, महाज्योती संस्थांमधील 3 हजार 500 हून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पीएचडी सोडण्याचा निर्णय

गरीब घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्‍या फेलोशिपचा आर्थिक हातभार होता. तोच आधार राज्य सरकारने काढून घेतला आहे. विद्यार्थ्यांना पीएचडी नियमित करावी लागत असल्यामुळे दैनंदिनसह इतर खर्चासाठी अन्य मार्ग निवडता येत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पीएचडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT