कौलव, पुढारी वृत्तसेवा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील सरपंच रामचंद्र सदाशिव कुंभार यांना तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. या घटनेमुळे विरोधी गटाला धक्का बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी कौलव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. सरपंच पद इतर मागासवर्ग या प्रवर्गासाठी राखीव होते. प्रमुख राजकीय नेत्यांच्या आघाडीकडून एकनाथ बापू कुंभार तर विरोधी आघाडीकडून रामचंद्र कुंभार हे उमेदवार होते. त्यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला होता. मात्र, त्यांना दोन पत्नी व तीन मुले असल्याची माहिती त्यांनी लपवल्याची तक्रार पराभूत उमेदवार एकनाथ कुंभार यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यावर सुनावणी सुरू होती.
रामचंद्र कुंभार यांना दि १ डिसेंबर २००१ नंतर तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून ग्रामपंचायत अधिनियम १५८ कलम १४(१) ज(१)नुसार अपात्र करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घोषित केले. हा निर्णय मान्य नसल्यास विहीत मुदतीत विभागीय आयुक्ताकडे अपिल करण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली आहे.
कौलव गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाचे आहे. मात्र गावच्या राजकीय इतिहासात असा अपात्रतेचा प्रकार कधीही घडलेला नव्हता. त्यामुळे विरोधी गटाला धक्का बसला आहे .