कोल्हापूर

कोल्हापूर : संतोष पाटील जि.प.चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव संतोष पाटील यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची मुंबईला अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून बदली झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संजयसिंह चव्हाण यांच्या बदलीच्या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला.

संतोष पाटील हे मूळचे उंडेगाव (ता. बार्शी) येथील आहेत. कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी म्हणून निवड केली. 1996 मध्ये त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) व प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यामध्ये पांढरकवडा, अकोला, नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून 2016 साली बढती मिळाल्यानंतर त्यांनी 2016 ते 2018 या काळात नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. 2018 ते 2020 या काळात पिंपरी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. 2020 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्यावर विभागीय उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तेथे त्यांनी 2022 पर्यंत काम पाहिले.

सध्या ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून काम पाहत आहेत. आता त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सध्या जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट असून, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक अशी दुहेरी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

कोल्हापूर नेहमी स्मरणात राहील

सभागृह असताना आणि नसतानाही काम करण्याची संधी मला मिळाली. कोल्हापूरच्या ग्रामीण जनतेने खूप प्रेम दिले. अधिकारी, कर्मचारी यांची चांगली साथ मिळाल्यामुळे अडीच वर्षांत आपण शिक्षण, कृषीमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवू शकलो. त्यामुळे खूप समाधानी आहे. कोल्हापूर कायम आपल्या स्मरणात राहील, असे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT