कागल : कागल नगरपालिकेत १५ वर्षांहून अधिक काळ कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सविता पिंटू आवळे (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंत्राटी सेवेत असताना फंड, ईएसआय, पीएफ व अन्य सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करत संतप्त सफाई कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले. सकाळी सातच्या सुमारास आवळे यांचा मृतदेह पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आणून ठेवत कर्मचार्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी व शंखध्वनी करण्यात आला. आंदोलनात पालिकेतील विविध विभागांतील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावली. मुख्याधिकारी अजय पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी मागण्यांवर ठाम राहिले.
दुपारनंतर आंदोलन स्थगित
दुपारी झालेल्या विशेष सभेत दहा वर्षे सेवा केलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना कायम सेवेत घेण्याबाबत, ईएसआय व पीएफ नियमित भरणे, ११८ कर्मचार्यांची रोजंदारी यादी प्रसिद्ध करणे तसेच समान कामाला समान वेतनाबाबत प्रस्ताव तयार करून अंमलबजावणी करण्यासह विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर आंदोलन स्थगित करून मृतदेह हलविण्यात आला.