Sanika Potdar Case Radhanagari
सरवडे : राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथील विवाहिता सानिका गणेश पोतदार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोळांकूर व ऐनी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांना देण्यात आले.
सानिका पोतदार हिचा गुरुवारी (दि. ५ मार्च) सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने तिला सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेमुळे एका गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून अडीच वर्षे व अवघ्या चार दिवसांची दोन लहान मुले आईच्या मायेपासून वंचित झाली आहेत. रुग्णालयातील ढिसाळ कारभार व निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पंचक्रोशीतील सुमारे पंचवीस गावांतील नागरिक आरोग्य सेवा घेण्यासाठी येतात. गेल्या काही महिन्यांत येथे अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे धाडसी शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवून रुग्णालयाचा कारभार सुधारावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य आर. वाय. पाटील, सरपंच राजाराम कांबळे, उपसरपंच अरविंद निचिते, शिवानंद महाजन, संतोष पाटील, विकास पाटील, संजय कांबळे, रावसाहेब पानारी, गजानन गुळवणी, मानसिंग पाटील, मुकुंद चौगले, मिलिंद कुंभार, भिकुशेठ जांगनूरे, विलास तोरस्कर, मिथुन पानारी, अनिल पानारी यांच्यासह सोळांकूर व ऐनी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.