नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल व ज्युनिअर कॉलेजची हॉकी खेळाडू सानिका चंद्रकांत माने हिची जुलै महिन्यात इंग्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी मालिकेसाठी भारताच्या सबज्युनिअर हॉकी संघात निवड झाली आहे.
भारतीय हॉकी संघात निवड होणारी सानिका कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली खेळाडू ठरली आहे. त्यामुळे हॉकीची पंढरी असलेल्या नूलचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकले आहे. सानिकाचे मूळ गाव मुगळी (ता. गडहिंग्लज) असून नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत तिचे शिक्षण झाले. या शाळेच्या क्रीडांगणावर ती हाॅकी शिकली. सध्या ती पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मुंबई साई एक्स्टेंशन सेंटरमध्ये हॉकीचे प्रशिक्षण घेत आहे.
बंगळूर येथे झालेल्या देश पातळीवरील निवड चाचणी शिबिरातून तिची २१ वर्षांखालील सबज्युनिअर गटात भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे. भारताचा हॉकी संघ जुलैच्या पहिल्या आठवड्यात लंडन येथे जात आहे. भारत, स्कॉटलंड व लंडन या देशांत हॉकीची तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सानिका विविध गटांतून दहा वेळा महाराष्ट्राच्या संघातून हॉकी खेळली आहे. तीन वेळा तिने महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. बचाव फळीतील ती उत्कृष्ट खेळाडू आहे.
सानिकाला शाळेचे क्रीडाशिक्षक रमेश चौगुले, मनोहर मांगले, विनायक सावंत, सचिन पोवार, सागर जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, सचिव नानाप्पा माळगी, एस. आर. जाधव, मोहन भांडवले, विजय साळोखे (सरदार), प्राचार्य श्रीशैलाप्पा साखरे, वडील चंद्रकांत माने, आई ज्योती माने यांचे प्रोत्साहन लाभले.