सांगली जिल्ह्यातील ६० पुरुष व २० महिला कैदी कळंबा जेलमध्ये आणण्यात आले
पूरस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील ८० कैदी कळंबा जेलमध्ये!  Pudhari file photo
कोल्हापूर

Sangli Flood Updates : पूरस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील ८० कैदी कळंबा जेलमध्ये!

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : महापुराच्या पाश्वभूमीवर सांगली जिल्हा कारागृहातील ८० कैद्यांना सुरक्षिततेच्या कारणामुळे शुक्रवारी सकाळी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात हलविण्यात आले आहे. त्यामध्ये ६० पुरूष व २० महिला कैद्यांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यातीलही कैद्यांनाही येत्या दोन- तीन दिवसात 'कळंबा'मध्ये स्थलांतरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

खुनासह गांजा, मोबाईल व जीवघेणी हल्लाप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल झालेल्या आणि कळंबा कारागृहात बंदिस्त असलेल्या २५ कैद्यांना अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ कारागृहात हलविण्यात आले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे यांनी दिली.

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात महापूराची स्थिती गंभीर होत आहे. पाण्याची पातळी वाढू लागल्याने शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौक, कापडपेठ, रिसाला रोड, खणभाग, स्टेशन चौकात पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. राजवाडा चौक, गणेशदुर्ग पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाला महापुराच्या पाण्याचा धोका असल्याने कारागृहातील कैद्यांना अन्य जिल्ह्यातील कारागृहात सुरक्षास्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात ८० कैद्यांना आज सकाळी कळंबा कारागृहात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ६० पुरूष आणि २० महिला कैद्यांना बंदोबस्तात येथे आणण्यात आले. कळंबा कारागृहात १६९९ अशी क्षमता असताना सद्या २ हजार ११८ कैदी बंदिस्त आहेत. त्यामध्ये १०० महिला कैद्यांचा समावेश आहे.

कळंबा जेलमधील गांजा पुरवठा, मोबाईलचा वापर, मुंबईतील कैद्याचा खून तसेच हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या २५ कैद्यांना अकोला, नागपूर, यवतमाळ येथील कारागृहात हलविण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT