समरजितसिंह घाटगे 
कोल्हापूर

विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी येथील परिवर्तन सभेस अलोट गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सेनापती कापशी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम—तेने सांगत आहे. माझी नम—ता म्हणजे माझी कमजोरी समजू नका, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.

सेनापती कापशी (ता. कागल) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 हजार स्वाभिमानी जनतेने शेअर्सपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. पण ते कारखान्याच्या रेकॉर्डवर कुठेच सभासद म्हणून नोंद नाहीत. हे सभासद रेकॉर्डवर नसताना त्यांना दिलेल्या साखरेची नोंद कारखान्यात होऊ शकते का ? नाही. मग ही रेकॉर्डवर नसलेली साखर कोठून आली? या प्रश्नावर सभेतूनच उत्तर आले काटामारीतून. मुश्रीफांनी विकासकामात मलिदा मारला. तोच मलिदा त्यांनी कारखान्यातही मारला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यावेळी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांना पालकमंत्र्यांच्या घरात पोहोचवू दिले नाही. पोटतिडकीने कार्यकर्त्यांनी साहेब आमचा वाघ आहे, अशा घोषणा दिल्या. पण पालकमंत्री साहेबांनी काय केलं तर मागच्या दाराने पळून गेले. आज काय वाटत असेल त्यांच्या त्या कार्यकर्त्यांना?

पालकमंत्र्यांनी नेहमीच पुरोगामी विचारांना तिलांजली दिली. शरद पवार साहेबांसोबतची निष्ठा विकली. कशासाठी तर ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी. त्यामुळे या निवडणुकीत या प्रवृत्तीला गाडूया. पालकमंत्री मुश्रीफांनी लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे नाव बदलून हसन मियाँलाल मुश्रीफ ठेवण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी बहाद्दर सभासदांनी त्यांच्या पॅनेलला चितपट करून त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले. याही निवडणुकीत त्यांना चितपट करून स्वर्गीय मंडलिकांचे अपुरे स्वप्न पूर्ण करूया.

स्वाती कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज साखर कारखाना हसन मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खासगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा, त्यांची हुकूमशाही व दडपशाही सुरू आहे. दत्तोपंत वालावलकर म्हणाले, ‘गेली पंचवीस वर्षे आम्ही मुश्रीफांच्या विचारधारेला विरोध करत आलो आहे. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ या त्यांच्या धोरणाविरोधात आम्ही काम केले आहे. या निवडणुकीत संजयबाबा घाटगे यांनी विचार बदलला, मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. म्हणून आम्ही त्यांना नमस्कार केला. मुश्रीफांनी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व संजयबाबा तुम्हाला दिलेला त्रास, तुम्ही विसरला असाल. पण आम्ही तीळभरही विसरलेलो नाही.

उमेश देसाई म्हणाले, ‘पाण्याच्या रूपाने स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी शाश्वत विकासाचे काम केले आहे. चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरत नव्हते त्यावेळी धरणच चुकीच्या जागी बांधले गेलेचा डांगोरा पेटवला. मात्र राजे समरजितसिंह घाटगे यांनी यावर उपाय शोधून कार्य केले आणि गेल्या तीन-चार वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. याला शाश्वत विकास म्हणावे लागेल. यावेळी बोलताना अ‍ॅड. सुरेश कुराडे म्हणाले, कापशी खोर्‍याची माती ही क्रांतिकारकांची आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची या मातीशी नाळ खूप घट्ट जुळलेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना गाढण्याचं स्व. मंडलिकांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निरोप घेऊनच मी आपल्याकडे आलो आहे. स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच तुकाराम भारमल यांनी केले. सचिन सुतार यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT