कोल्हापूर : पायाला बांधलेल्या स्केटिंगवर शरीराचा तोल सांभाळून दोन्ही हातांनी काठी फिरवत स्केटिंग करण्याचा अनोखा राष्ट्रीय विक्रम कोल्हापूरच्या समरजित विशाल जितकर याने केला. ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साडेपाच वर्षांच्या समरजितने इनलाईन स्केटिंग करत शिवछत्रपतींना अनोखी मानवंदना दिली. प्रतिभानगर-रेड्याची टक्कर येथील खांडेकर प्रशालेच्या स्केटिंग ट्रॅकवर हा विक्रम झाला.
विक्रमासाठी समरजितने गेली वर्षभर सराव केला. तो राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असून त्याला आई अमृता जितकर व वडील विशाल जितकर तसेच एस. के. रोलर स्केटिंग ॲकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर व लाठी प्रशिक्षक विक्रांत सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. समरजितचा गौरव नगरसेवक एन. आर. बुधले, नगरसेवक अमर समर्थ, संताजी घोरपडे, उद्योजक विशाल गवळी, माजी पोलिस निरीक्षक संजय दळवी, उद्योजक सुधीर खोत, सतीश पवार, टिंकू देशपांडे, तानाजी गुडाळे, रवी नलवडे, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते झाला.
असा झाला समरजितचा अनोखा विक्रम
शनिवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी समरजितने विक्रमाला सुरुवात केली. ६० मिनिटांत म्हणजेच ७ वाजून १० मिनिटांनी विक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. काठी फिरवत इनलाईन स्केटिंग करत १५६ फेऱ्या पूर्ण करून १४ किलोमीटर अंतर पार केले. विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी पवन सोलंकी यांनी ऑनलाईन पद्धतीने केली.