Kagal political News | समरजित यांची घरवापसी; मुश्रीफांची डोकेदुखी? 
कोल्हापूर

Kagal political News | समरजित यांची घरवापसी; मुश्रीफांची डोकेदुखी?

कागल विधानसभा मतदारसंघासह राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘एकमेकातील वैर संपले’ अशी घोषणा करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात गळा घातलेल्या समरजित घाटगे यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. हे घरवापसी भविष्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी ठरणार, अशी चर्चा कागल विधानसभा मतदारसंघासह राजकीय वर्तुळात आहे.

घाटगे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. घाटगे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक राजकारणातील कट्टर राजकीय शत्रू मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी हातमिळवणी केली होती. यावेळी त्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळा घालत आपले राजकीय वैर संपल्याची घोषणा करून एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती.

घाटगे यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 मध्ये त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी दुसर्‍या क्रमांकाची मते घेऊन ते पराभूत झाले होते. 2024 मध्ये निवडणुकीतील उमेदवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी युतीतील प्रवेशामुळे घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे निवडणूक लढविली; मात्र तेव्हाही त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. भाजप आणि राष्ट्रवादी राज्यात महायुतीचे घटक पक्ष असले, तरी घाटगे यांच्या भाजप प्रवेशाने कागलमध्ये पुन्हा एकदा घाटगे-मुश्रीफ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळचे नेत्यांचे मनोमिलन पुन्हा राजकीय शत्रुत्वात परावर्तीत झाल्याने कायमस्वरूपी राहील का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अखिलेशसिंह घाटगे, विरेंद्रसिंह घाटगे, पं.स. सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण, जि.प.सदस्या शिवानी भोसले, पं.स. सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना अस्वले, नगरसेवक दीपक मगर, अरुण गुरव, सारिका बारड, साधना पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैला जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

जिल्ह्यात जोमाने काम करणार

पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना समरजित घाटगे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आतापर्यंत अनेक राजकीय प्रयोग झाले; पण आता प्रयोगांना स्कोप नाही. आपण आपल्या मूळ पक्षात परतलो आहोत. आता चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात जोमाने काम करायचे आहे.

मुश्रीफ आणि माझ्यातील वैर संपले : घाटगे

कागलमध्ये गेली अनेक वर्षे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, पक्ष प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना घाटगे यांनी हा संघर्ष संपल्याचे सांगितले. हसन मुश्रीफ आणि माझ्यातील वैर आता संपले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते सर्वांनी पाहिलेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा संघर्ष संपवला असून, आगामी काळात आमच्यात उत्तम समन्वय जिल्ह्यात दिसेल, असे घाटगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोडण्यापूर्वी आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे घाटगे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच मी शरद पवार यांची भेट घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना कल्पना देऊनच मी हा पुढचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले.

समरजित घाटगे यांचा राजकीय प्रवास

2015 : भाजपमधून सक्रिय राजकारणात प्रवेश

2018 : भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी

2019 : उमेदवारी न मिळाल्याने मुश्रीफांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली; मात्र पराभव

2024 : महायुतीत कागलची जागा मुश्रीफांकडे गेल्याने शरद पवारांच्या पक्षात प्रवेश;

विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव.

2025 : स्थानिक निवडणुकांमध्ये मुश्रीफांशी जुळवून घेत युती

8 एप्रिल 2026 : पुन्हा भाजपमध्ये प्रवेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT