समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.  file photo
कोल्हापूर

समरजित घाटगेंनी फुंकली तुतारी; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकून आज (दि. 3) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. कागल मधील गैबी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटगे यांनी पक्ष प्रवेश केला.

एकेकाळी काँग्रेसमध्ये कोंडी झाल्यामुळे विक्रमसिंह घाटगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तीच वेळ समरजित यांच्यावर आली. काँग्रेस राष्ट्रवादीत संधी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रवेशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तर नंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समरजित घाटगे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. घाटगे यांना भाजपच्या माध्यमातुन म्हाडा पुणेचे अध्यक्षपद देण्यात आले होते, तसेच भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने तुतारी फुंकण्याचे त्यांनी ठरविले.

आज (दि.३) शरद पवार यांनी समरजित घाटगे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत कागलमध्ये आयोजीत कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे कागलमधील विधानसभा निवडणुकीचे चित्र पालटणार असून शरद पवार यांनी राजकीय विद्यापीठात नवा डाव टाकला आहे. यावेळी घाटगे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कागल मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

‘हिंदकेसरी’वर वस्तादांचा डाव

राजकारणात आलेल्या नव्या वळणावर हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. शरद पवार यांनी मोतिबाग तालमीच्या कार्यक्रमात या तालमीतून ‘हिंदकेसरी’ तयार होण्याची परंपरा आहे. मात्र, हसन मुश्रीफ हे राजकारणातले ‘हिंदकेसरी’ असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता राजकारणात वाटा वेगळ्या झाल्यानंतर राजकारणात ‘वस्ताद’ समजल्या जाणार्‍या शरद पवार यांनी आपल्याच हिंदकेसरीवर डाव टाकला आहे. राजकारणाच्या आखाड्यात आपल्याच चेल्याला चितपट करण्यासाठी वस्तादांनी दुसर्‍या तालमीच्या मल्लाला टिळा लावून मैदानात उतरवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कागलच्या आखाड्यात वस्तादांचा पठ्ठा विरुद्ध हिंदकेसरी अशीच लढत पाहायला मिळणार आहे.

गेल्या निवडणुकीत घाटगेंना ८७ हजारांवर मते

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांची उमेदवारी नक्की मानली जात होती. मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेने संजय घाटगे यांना उमेदवारी दिली. फडणवीस यांनी जाहीर करूनही ते घाटगे यांना भाजपची उमेदवारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणुन निवडणूक लढविली. मात्र तिरंगी लढतीचा फायदा अपेक्षेप्रमाणे मुश्रीफ यांनाच झाला. या निवडणुकीत मुश्रीफ यांना १ लाख १४ हजार २००, समरजित घाटगे यांना ८७ हजार ३२३ तर संजय घाटगे यांना ५५ हजार ६५७ मते मिळाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT