कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेकडे कोणताही उत्पन्नाचा ठोस मार्ग उपलब्ध नसल्याने पारंपरिक स्रोताच्या आधारेच महापालिका तग धरून आहे. वेतन, निवृत्तीवेतन आणि पाणीउपसा करण्यासाठी वापरले जाणार्या विजेचे बिल भरण्यातच महापालिकेची तिजोरी रिकामी होत आहे. घरफाळा, पाणीपट्टी, नगरचना विभाग, इस्टेट विभाग सोडले तर इतर कोणत्याही मार्गातून महापालिकेला पैसेच मिळत नसल्याने महापालिकेची आर्थिक कोंडी होत आहे.
पाचशे कोटींचे बजेट असणार्या महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक नागरी समस्यांनी डोके वर काढले असताना विकासकांमावर खर्च करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नसल्याने शहरातील रस्ते आणि इतर सेवा सुविधांवर त्याचा परिणाम होत आहे. कोल्हापूर महापालिकेला पूर्वी जकात आणि त्यानंतर एलबीटी कराच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत होते. महापालिकेच्या तिजोरीत दररोज ताज्या पैशाची भर पडत राहिली. 2011 मध्ये पहिल्यांदा जकात रद्द करून एलबीटी कर लागू केला. परंतु व्यापारी वर्गाच्या विरोधामुळे एलबीटी करदेखील रद्द झाला. त्यामुले महापालिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. घरफाळा आणि नगररचना विभागामार्फत देण्यात येणार्या बांधकाम परवानग्यांच्या बदल्यात आकारण्यात येणारे विकासशुल्क या खेरीज हक्काचे असे उत्पन्न महापालिकेला मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाकडच्या योजना म्हणजे पांंढरा हत्ती पाळल्यासारखी स्थिती आहे. पाणीपुरवठा विभागालाच महापालिकेकडून निधी द्यावा लागतो. पाणीपट्टीतून जमा होणार्या पैशाखेरीज या विभागावर जादाचा खर्च करावा लागत आहे.
शहरातील विकासकामांना निधी नाही. महापालिकेकडे उत्पन्नाची जी ठोस साधने आहेत त्यापैकी घरफाळा आणि पाणीपट्टी ही सामान्य. नागरिकांशी निगडीत असणारे विभाग आहेत. त्यामुळे हे कर वाढविणे नागरिकांवर ओझे टाकण्यासारखे असल्याने गेल्या 14 वर्षांपूर्वीचेच कराचे स्ट्रक्चर वापरून कर आकारणी केली जाते. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न आहे तेवढेच आहे. उत्पन्न वाढत नाही. याउलट खर्चाचे प्रमाण वाढत आहे. एकट्या विद्युत बिलावर महापालिकेचा वर्षभरात 50 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. हे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.
महापालिकेच्या घरफाळा, पाणीपुरवठा आणि इस्टेट विभागात मोठी थकबाकी आहे. या तिन्ही विभागाकडे मिळून शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल झाली तर महापालिकेच्या आर्थिक स्थितीला हातभार लागणार आहे. महापालिका आर्थिकद़ृष्ट्या टिकणार आहे.