Gaur Attack | साखरीतील शेतकरी गव्याच्या हल्ल्यात गंभीर 
कोल्हापूर

Gaur Attack | साखरीतील शेतकरी गव्याच्या हल्ल्यात गंभीर

पुढारी वृत्तसेवा

साळवण : वैरणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्याची घटना साखरी (ता. गगनबावडा) येथे शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात हिंदुराव बळवंत कोटकर (वय ५२) यांच्या पोटात शिंग घुसल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंदुराव कोटकर हे शनिवारी सकाळी साखरी येथील ‘तळीचे वताड’ परिसरातील शेतात वैरण कापण्यासाठी गेले होते. यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर झडप घालत जोरदार धडक दिली. या धडकेत शिंग त्यांच्या पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी कोटकर यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील इतर शेतकरी मदतीसाठी धावले. दुखापत गंभीर असल्याने त्यांना चालत बाहेर आणणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतात मचाणासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी शिडीवर झोपवून ग्रामस्थांनी त्यांना आणले.

वन विभागाकडून तातडीची एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक राऊत व वनरक्षक सूर्यकांत गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. गगनबावडा तालुक्यात गवे, बिबटे व इतर वन्यप्राण्यांचा शेत परिसरातील वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. वन विभागाने अशा भागात नियमित गस्त वाढवून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने पाहणी

वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने दुपारनंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने परिसराची पाहणी केली. हल्ला करणारा गवा अद्याप परिसरातच आहे की जंगलाच्या दिशेने निघून गेला आहे, याची खात्री करण्यासाठी ड्रोनद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT