संजीव गायकवाड
सैनिक टाकळी : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पूर्वा रामचंद्र पाटील हिने थेट अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘जागतिक लिडरशिप प्रोग्रॅम’मध्ये स्थान मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
पूर्वाचे वडील रामचंद्र आणि आई स्वाती पाटील हे शेतकरी आहेत. ऊस पिकाला मिळणारा कमी दर आणि तोडणीसाठी लागणारा 18 ते 20 महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी, यातून होणारे नुकसान तिने जवळून अनुभवले आहे. याच समस्येवर शाश्वत तोडगा काढण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन तिने या जागतिक कार्यक्रमासाठी अर्ज केला होता. सध्या ती जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. अॅग्रीच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत आहे.
युकेचे करिअर सल्लागार विनायक हेगाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘सुपर 25 प्रोग्राम’ अंतर्गत तिने ही संधी मिळवली. हा कार्यक्रम हार्वर्ड बिझनेस स्कूलमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार असून, 6 ऑगस्टपासून त्याला सुरुवात होईल. यामध्ये प्रशिक्षणासोबतच सामाजिक उद्योजकतेवर आधारित स्पर्धाही होणार आहे. हलाखीच्या परिस्थितीतही कुटुंबाने दिलेल्या पाठबळामुळेच हे यश शक्य झाल्याचे पूर्वा सांगते. या निवडीमुळे सैनिक टाकळीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.