कोल्हापूर

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार ‌‘तारा‌’ची डरकाळी

ताडोबातील ‌‘चंदा‌’ नव्या नावासह दाखल : ‌‘ऑपरेशन तारा‌’ फत्ते; आणखी 7 वाघ येणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ प्रकल्पात आता ‌‘तारा‌’ची डरकाळी घुमणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्पातील चंदा वाघीण एक हजार कि.मी.चा 27 तासांचा प्रवास करत शुक्रवारी पहाटे चांदोलीत (जि. सांगली) दाखल झाली. तिला सोनार्ली येथील ‌‘एनक्लोजर‌’मध्ये सोडण्यात आले. याकरिता राबविण्यात आलेले ‌‘ऑपरेशन तारा‌’ फत्ते झाले असून लवकरच आणखी सात वाघ आणण्यात येणार आहेत.

सह्याद्री व्याघ प्रकल्पात आठ वाघ आणण्यात येणार आहेत. ते ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्प आणि पेंच व्याघ प्रकल्पातून स्थानांतरित करण्यास केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तीन नर आणि पाच मादी असे आठ वाघ आणण्यात येणार असून ‌‘ऑपरेशन तारा‌’अंतर्गत ताडोबातील चंदा वाघीण सह्याद्री व्याघ प्रकल्पात आणण्यात आली. ‌‘चंदा‌’चे सह्याद्री व्याघ प्रकल्पात आता ‌‘तारा‌’असे नामकरण केले असून तिला ‌‘एसटीआरटी 04‌’ असा सांकेतिक क्रमांकही देण्यात आला आहे. भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षिततेचे सर्व मानदंड वापरून स्थानांतराची ही मोहीम राबविण्यात आली.

चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोबागडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. बुधवारी (दि. 12) ताडोबा येथून रात्री दहा वाजता तिचा प्रवास सुरू झाला. शुक्रवारी रात्री दीड वाजता या वाघिणीला घेऊन पथक चांदोली येथे दाखल झाले. तपासण्यानंतर रात्री 3 वाजून 20 मिनिटांनी तिला ‌‘एनक्लोजर‌’मध्ये सोडले. व्याघ प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वन संरक्षक संदेश पाटील, बाबासाहेब हाके, चांदोली वन क्षेत्रपाल ऋषीकेश पाटील, आंबा वन क्षेत्रपाल प्रदीप कोकीतकर, ढेबेवाडीचे वन क्षेत्रपाल किरण माने, संग््रााम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, आकाश पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ अधिवास बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सह्याद्रीसाठी हा ऐतिहासिक व महत्त्वाचा टप्पा आहे. चंदा वाघिणीच्या सॉफ्ट रीलिजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
- तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT