बाबवडे : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील मौजे उखळू पैकी आंबाईवाडा धनगरवाड्यात वनवा प्रतिबंध आणि वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आहे. जंगलात कोणत्याही परिस्थितीत आग लावणार नाही, तसेच वनवा लावण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने वनविभागाला माहिती देऊ, अशी सामूहिक शपथ ग्रामस्थांनी घेतली. वनविभागाच्या वतीने आयोजित जनजागृती बैठकीत ग्रामस्थांनी हा निर्धार व्यक्त केला.
मागील वर्षी या परिसरातील वनक्षेत्रात आग लागण्याची घटना घडली होती. याप्रकरणी वनविभागाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. जंगलातील आगीच्या घटनांमुळे मौल्यवान वृक्षसंपदा, नव्याने उगवणारी रोपे, वन्यप्राणी, पक्षी तसेच नैसर्गिक जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याशिवाय संपूर्ण जैवविविधतेला धोका निर्माण होतो. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि ग्रामस्थांमध्ये वनसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने वनविभागाने ही बैठक घेतली.
या बैठकीत वनव्याचे दुष्परिणाम, जंगलाचे पर्यावरणीय महत्त्व आणि वनसंपत्ती जतन करण्याची आवश्यकता याबाबत ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जंगलातील वणवा केवळ झाडांचे नुकसान करत नाही, तर वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट करतो. त्यामुळे वनव्याला प्रतिबंध करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी जंगलात आग लावणार नाही, तसेच अन्य कोणी आग लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती तत्काळ वनविभागाला देऊ, अशी सामूहिक शपथ घेतली. वनवा रोखण्यासाठी वनविभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक सुभाष वसावे, विलास पाटील, माजी सरपंच राजाराम मुटल, विकास पाटील, विठ्ठल झोरे, माजी उपसरपंच निवृत्ती खोत, दीपक गावडे, ग्रामपंचायत सदस्य नथूराम खोत, जनार्दन गावडे, तुकाराम झोरे गुरुजी यांच्यासह धनगरवाड्यातील ग्रामस्थ व वनसेवक उपस्थित होते..