कोल्हापूर

९३ वरून थेट ५५० गावे; सह्याद्री व्याघ्र कॅरिडॉर विस्ताराने विकासाला ‘ब्रेक’ ?

वन्यजीव संरक्षण महत्त्वाचे असले तरी स्थानिकांच्या विकासाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याची भूमिका नागरिकांनी मांडली आहे

पुढारी वृत्तसेवा

आनंदा केसरे

बांबवडे : सह्याद्री व्याघ्र कॅरिडॉरच्या विस्तारीकरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी केवळ ९३ गावांचा समावेश असलेल्या या प्रस्तावित कॅरिडॉरमध्ये आता तब्बल ५५० गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यांतील गावे, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका तसेच सातारा जिल्ह्यातील काही भाग नव्या विस्तारित कॅरिडॉरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या विस्तारामुळे स्थानिक विकास प्रकल्प, बांधकाम परवानग्या, उद्योग आणि शेतीपूरक उपक्रमांवर विविध प्रकारच्या मर्यादा येण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या मते, कॅरिडॉर जाहीर झाल्यानंतर घरबांधणी, रस्ते, पर्यटन व्यवसाय आणि जमीन व्यवहारांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला मोठा फटका बसू शकतो. अनेक ग्रामपंचायती आणि शेतकरी संघटनांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या विस्तारित व्याघ्र कॅरिडॉरबाबत वनविभागाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. अधिकृत अधिसूचना, निकष आणि गावांच्या अंतिम यादीबाबत ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. वन्यजीव संरक्षण महत्त्वाचे असले तरी स्थानिकांच्या विकासाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याची भूमिका नागरिकांनी मांडली आहे. सह्याद्रीच्या संवर्धनासोबत गावांच्या विकासाचा समतोल कसा साधला जाणार, याकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT