देवराईंचे वनवैभव नष्ट होण्याच्या मार्गावर! Pudhari File Photo
कोल्हापूर

देवराईंचे वनवैभव नष्ट होण्याच्या मार्गावर!

राज्यात उरल्या केवळ 3 हजार देवराई : पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : देवराई किंवा वनराई म्हणजे गावचे ‘वनवैभव’. आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाच्या रक्षणाच्या हेतूने राज्यात अशा हजारो देवराई शेकडो वर्षांपासून जतन करून ठेवल्या होत्या. मात्र काळाच्या ओघात या देवराई नष्ट होत असून केवळ काही मोजक्याच वनराई कशाबशा आपले अस्तित्व टिकवून आहेत.

देवराईंची संकल्पना!

पूर्वी प्रत्येक गावनिहाय किमान एक-दोन देवराई असायच्याच. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखीव ठेवलेले जंगल. अनादी काळापासून लोकांच्या मनात देव या संकल्पनेविषयी एक आदरयुक्त, श्रद्धायुक्त भीती होती. त्यामुळे देवराईंच्या संवर्धनासाठी देवाच्या नावाचा आधार घेतला गेला असावा. देवराईंना देवदेवतांची नावे चिकटल्यामुळे आपोआपच त्याठिकाणी कुर्‍हाडबंदी, चराईबंदी आणि शिकारबंदी लागू होऊन त्याचे जतन आणि संवर्धन होत गेले.

राज्यात तीन हजार देवराई!

देशात पूर्वी अक्षरश: लाखो देवराई होत्या. मात्र सध्या देशात केवळ 13,000 देवराई आपले अस्तित्व राखून आहेत. विशेष समाधानाची बाब म्हणजे या 13 हजारपैकी तीन हजार देवराई या एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील तीन हजार देवराईंपैकी एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1600 आणि रत्नागिरी जिल्ह्यात 900 देवराई आढळून येतात. या देवराई शेकडो वर्षांच्या असून त्यामध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. मराठवाडा आणि विदर्भात मात्र आजकाल देवराईंचे फारसे अस्तित्व आढळून येत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातही शेकडो वर्षांपासून काही देवराई स्थानिकांनी प्रयत्नपूर्वक जतन केलेल्या दिसून येतात.

कोल्हापुरातील देवराया!

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास आठ-दहा देवराया आढळून येतात. त्यामध्ये म्हाळुंगे येथील स्मृती देवराई, चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर येथील जैन देवराई, पाटपन्हाळा-जानवळ्याची देवराई, वाघजाईची देवराई, आंबा येथील देवराई या देवराई वैशिष्ट्यपूर्ण आणि जैवविविधतेने नटलेल्या आहेत. यातील काही देवराईंमध्ये अतिशय दुर्मीळ आणि जवळजवळ लुप्त होत चाललेल्या शेकडो वनस्पती आढळून आलेल्या आहेत.

वनौैषधींचे भांडार!

प्राचीन काळी मानवाकडे कोणत्याही आजारासाठी झाडपाल्याशिवाय अन्य कोणताही उपाय नव्हता. त्यामुळे बहुतेक सगळ्या देवराईमध्ये अत्यंत दुर्मीळ अशा वनौषधींची लागवड, जतन आणि संवर्धन केल्याचे दिसते. देवराईंमधील अनेक वनौषधी अनेक दुर्धर आजारावरसुद्धा गुणकारी ठरल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे या देवराई म्हणजे वनौषधींची जिवंत भांडारे आहेत, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.

देवराईतील प्राणी!

आजकाल सर्वत्र सिमेंटच्या जंगलांचा पसारा वाढत चालला आहे, आहे त्या जंगलांचीही कत्तल सुरू आहे. अशा परिस्थितीत अजूनही आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या देवराईच अनेक जंगली प्राण्यांच्या अखेरचे आश्रयस्थान बनल्या आहेत. या देवराईंमध्ये सांबर, भेकर, ससे, माकड, रानडुक्कर, शेकरू, सायाळ, रानमांजर, उदीमांजर आदी प्राणी आढळून येतात. तर कधी कधी बिबट्या आणि वाघांसारखे प्राणीसुद्धा या देवराईंच्या आश्रयाला येताना दिसतात.

देवराईंमधील पक्षी पसारा!

आजकाल अनेक देवराई या शेकडो पक्ष्यांचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून उभ्या आहेत. महाराष्ट्रातील अन्य भागात क्वचितच आढळून येणार्‍या गरुडाच्या विविध प्रजातींचे अस्तित्व केवळ देवराईंमध्येच टिकून असलेले दिसते. याशिवाय घार, मोर, कावळे, पोपट, अनेक प्रकारच्या चिमण्या, वटवाघळे, सूर्यपक्षी, धनेश, बुलबुल, कुकू, कोकीळ, घुबड, तांबट, कोतवाल आदी शेकडो पक्ष्यांसह सापांच्याही कित्येक प्रजाती येथे आढळून येतात.

देवराईंवर घाला!

आदिवासी लोकांनी शेकडो वर्षांपासून जतन करून सांभाळलेल्या या देवराईंवर गेल्या काही दिवसांमध्ये घाला घातला जात असल्याचे दिसत आहे. शेकडो वर्षांपासून ज्या देवराईमध्ये कुर्‍हाडबंदी होती, अशा देवराई रातोरात कापून लंपास केल्या जात असताना दिसत आहे. काही देवराई ‘पिकनिक स्पॉट’ बनून गेल्या असून बाह्य जगताच्या अतिक्रमणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या श्रद्धेने आणि इमानेइतबारे पूर्वजांनी या देवराया जतन केल्या आहेत, त्याच श्रद्धेने त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे; किंबहुना ती काळाची गरज आहे, असे म्हणावे लागेल.

देवराई श्रद्धापूर्वक जतन करण्याची आवश्यकता

पर्यावरण संवर्धनामध्ये देवराईंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या देवराईंमुळे जैवविविधता व नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर टिकून आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांच्या जतनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शेकडो वर्षांपासून देवराईंंनी पार पाडलेली आहे. पूर्वी भलेही या देवराई आदिमानवांनी अंधश्रद्धेपोटी जतन केल्या असतील; पण आता या देवराईंचे जतन श्रद्धापूर्वक करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ज्ञ, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT