कोल्हापूर : न्यूमोनिया या जीवघेण्या आजारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्यभरात ‘सांस’ (एसएसएएनएस) या महत्त्वाकांक्षी आरोग्य मोहिमेचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. राज्यातील एकूण बालमृत्यूंपैकी तब्बल 16.3 टक्के मृत्यू एकट्या न्यूमोनियामुळे होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर, शासन स्तरावर हा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 12 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 28 फेबुवारीपर्तंत राबवली जाणार आहे. याद्वारे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सांस अर्थात ‘न्यूमोनियाला यशस्वीपणे निष्प्रभ करण्यासाठी सामाजिक जागृती आणि कृती’ या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ उपचार करणे नाही, तर या आजाराविषयी समाजात खोलवर जागरूकता निर्माण करणे हा आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करतील. बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आहेत का, याची बारकाईने तपासणी केली जाईल. लक्षणे आढळल्यास बालकांवर तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले जातील आणि गरज भासल्यास त्यांना पुढील उपचारांसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी संदर्भ सेवा पुरवली जाईल.
धोक्याची घंटा : ‘ही’ लक्षणे ओळखा
खूप जास्त काळ खोकला, श्वास घेण्यास त्रास, बाळाला दूध ओढता न येणे, बाळ सुस्त होणे, खेळणे बंद करणे किंवा बेशुद्ध पडणे, ओठ आणि हाता-पायांची बोटे निळसर पडणे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी 90 टक्क्यांपेक्षा कमी होणे. सोशल मीडिया, पोस्टर्स, बॅनर्स आणि हस्तपत्रिकांच्या माध्यमातून या मोहिमेची आणि न्यूमोनियाच्या लक्षणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
या मोहिमेसाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. न्यूमोनिया व डायरिया ही बालमृत्यूची प्रमुख कारणे आहेत. याचे गांभीर्य ओळखून ही मोहीम राबवली जात आहे. आशा सेविका आता घरोघरी जाऊन माता-बालकांची आरोग्य तपासणी करतील. लक्षणे आढळल्यास बाळावर नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार केले जातील.- डॉ. अनिरुद्ध पिंपळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी