कोल्हापूर : उपद्रवी रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर. माझा कॅसिनोमधील व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी पैशाची मागणी करण्यासाठी एका व्यक्तीला इंगवलेंने आमच्याकडे पाठविले होते; पण आम्ही त्याला भिक घातली नाही. अशा पद्धतीने कोल्हापुरातील अनेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे, गंडा घालण्याचे काम इंगवले याने केले आहे व करत आहे. त्याने आज सोशल मीडियाला प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिपसोबत जी ऑडीओ क्लिप प्रसिद्ध केली असून, यामध्ये वापरण्यात आलेल्या अपशब्दांद्वारे आमची नाहक बदनामी केली आहे. त्याच्यावर आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असून, हा एडीट केलेला व्हिडीओ त्यांनी प्रसारित केला असून, यातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्याविरुद्ध पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत आहोत, असे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ऑक्टोबर 2025 मधील जुनाच व्हिडीओ
हा व्हिडीओ प्रसारित करण्यात मुळात काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचाच हात आहे. कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सतेज पाटील यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध करून याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी आ. राजेश क्षीरसागर यांचा यामध्ये कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे.
इंगवलेच्या भुंकण्याचा परिणाम नाही
रवी इंगवले कितीही भुंकला तरीही कोल्हापूर शहरातील जनतेसाठी आ. क्षीरसागर यांचे विकासात्मक, आंदोलनात्मक, सामाजिक, आरोग्यविषयक, क्रीडा, कला क्षेत्रातील जे योगदान आहे, त्यामुळे जनतेचा आ. क्षीरसागर यांच्यावर असलेला विश्वास कधीही कमी होणार नाही. आ. क्षीरसागर हे विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत असून, रविवारी (दि. २८) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करतील, असेही नगरसेवक क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.
आमदार क्षीरसागर यांचा संबंध नसल्याचे त्यावेळीच स्पष्ट
ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ बनविला होता त्या व्यक्तीने त्याचे लेखी म्हणणे व स्वत:चा व्हिडीओ तयार करून आ. क्षीरसागर यांचा यामध्ये कसलाही संबध नसल्याचे जाहीर केले आहे. रवी इंगवले हा लायकीशून्य असलेला गुंड असून, मी काही बोलण्यापेक्षा कोल्हापूर शहरातील जनता सुज्ञ असून, जनतेने त्याला त्याची लायकी दाखवून दिली आहे.
मनपा निवडणुकीतच झाला होता आरोप
आ. पाटील यांनी निवडणुकीत मतदानाच्या तोंडावर हा व्हिडीओ व्हायरल केला असला, तरी त्यानंतर महापालिका निवडणुकीत शहरातील सुज्ञ मतदारांनी आ. क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला सत्तेत आणले. पण सध्या सत्तेअभावी आ. पाटील यांचा जळफळात होत असल्यानेच “एडा बनून पेढा खाण्यात” ते मग्न आहेत.