राजेंद्र जोशी
कोल्हापूर : पश्चिम आशियातील संकटामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असताना, रशियाने भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल आणि वायुपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या 88 टक्के कच्चे तेल आयात करतो, ज्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो. या पार्श्वभूमीवर, रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यास सदैव तयार असल्याचे प्रतिपादन रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी गुरुवारी केले.
जगातील जलवाहतुकीवर ट्रॅकिंग करणार्या ‘केप्लर’ आणि ‘व्हॉर्टिक्स’ या दोन संस्थांच्या आकडेवारीनुसार, ‘युराल्स’ दर्जाचे रशियन कच्चे तेल घेऊन येणारे दोन टँकर या आठवड्यात भारतीय बंदरांवर उतरण्याची शक्यता आहे. यापूर्वी या जहाजांनी पूर्व आशियाकडे जात असल्याचे संकेत दिले होते. तथापि, त्यांनी आपला मार्ग अचानक बदलून भारताची दिशा पकडली. यामध्ये 7.3 लाख बॅरल्स तेल घेऊन आलेले ‘ओड्यून’ जहाज ओडिशातील पारादीप बंदरावर, तर सात लाख बॅरल्सपेक्षा अधिक तेल घेऊन आलेल्या ‘ऑफ्रामॅक्स’ श्रेणीतील ‘मातारी’ हा टँकर गुजरामधील वाडीनार बंदरात पोहोचेल, असे या दोन संस्थांचे मत आहे. तथापि, या जहाजांतील तेलाची उतराई सुरू झाली की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
रशिया भारताला यापूर्वी बाल्टिक आणि काळ्या समुद्रातील बंदरातून लोड होणारा ‘युराल्स’ कच्च्या तेलाचा पुरवठा करीत होता. भारतीय रिफायनरीज या कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होत्या. भारताच्या एकूण आयातीच्या सुमारे 40 टक्क्यांवर ही आयात पोहोचली होती. परंतु, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियन तेलाकडे पाठ फिरवून आपला मोर्चा व्हेनेझुएलाकडे वळविला.
... तर भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम
व्यापारी करारात अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या सरकारी तेल कंपन्यांनीही रशियन तेलाची खरेदी जवळजवळ थांबविली होती. आता तेल वेळेवर उपलब्ध झाले नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सध्या रशियन तेल खरेदीच्या हालचाली सुरू आहेत. त्याला दुजोरा देणारे वृत्त ‘केप्लर’ आणि ‘व्हॉर्टिक्स’ या संस्थांनी दिले आहे.