कोल्हापूर : अमेरिका - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर टंचाईच्या धास्तीने गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. मंगळवारी शहरातील बहुतांश वितरकांच्या कार्यालयासमोर सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. राजारामपुरी, संभाजीनगर, मंगळवार पेठ आदींसह ठिकठिकाणी असेच चित्र होते. दरम्यान, संभाजीनगर येथे गॅस सिलिंडरसाठी संतप्त ग्राहकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात सुमारे नऊ ते साडेनऊ लाख गॅस ग्राहक आहेत; तर विविध कंपन्यांच्या सुमारे 111 एजन्सीज आहेत. गेले काही दिवस युद्धामुळेे सर्वसामान्यांमध्ये घरगुती गॅस, डिझेल-पेट्रोल तुटवड्याबाबत संभ—म निर्माण झाला आहे. इंधन तुटवड्याचा प्रश्न निर्माण होईल या धास्तीने वाहनधारक पेट्रोल पंपांवर गर्दी करीत आहेत. नागरिक गॅस वितरक कार्यालयासमोर रांगा लावत आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक असणार्या गॅस सिलिंडरबाबत नागरिक चिंतेत आहेत. एक सिलिंडर असणार्या कुटुंबाची चांगलीच तारांबळ उडते. अशातच सिलिंडर लवकर मिळणार नाही या चर्चेने वितरण कार्यालयासमोर गर्दी वाढत आहे. मंगळवारी नागरिकांनी संभाजीनगर, मंगळवार पेठ, राजारामपुरीसह शहरातील अनेक गॅस वितरकांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली.
शासनाने प्रत्येक कुटुंबास दरमहा एकच सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. 21 दिवसांनंतर बुकिंग करण्याची सोय आता 25 दिवसांवर पोहोचली आहे. त्यामुळे गॅस मिळेल की नाही या धास्तीने नागरिक धावाधाव करीत आहेत. यामुळे गॅस वितरकांची मात्र पंचाईत होत आहे. नागरिक अचानक गर्दी करीत असल्याने गॅस वितरकांना गॅस पुरवठा करताना मर्यादा येत आहेत. शासनाने व्यावसायिक वर्गवारीतील औद्योगिक आणि हॉटेलचा गॅस पुरवठा काही प्रमाणात थांबवला आहे; तर शैक्षणिक रुग्णालयांचा गॅस पुरवठा मात्र सुरू ठेवला आहे. एक सिलिंडर असणार्या कुटुंबांना सध्या अधिक चिंता भेडसावत आहे. अशातच दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिलिंडर असणारे ग्राहकही अडचण नको म्हणून जादा सिलिंडर घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यात 26 हजारांवर गॅस सिलिंडरची गरज
जिल्ह्यात 26 हजार 650 सिलिंडरची आवश्यकता आहे. 9 मार्च रोजी जिल्ह्यात 42 हजार 422 सिलिंडरचा साठा असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, इचलकरंजीत अधिकृत बुकिंग केल्यानंतर ओटीपी प्रणालीद्वारे सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे केला जात आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कधी पूर्ववत होणार याकडे आता व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात गॅस तुटवडा नाही
जिल्ह्यातील नारगरिकांच्या मागणीइतका गॅस पुरवठा होत आहे. सध्या तरी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. नागरिकांनी गॅससाठी धावाधाव करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
साडेनऊ लाख ग्राहक, 112 एजन्सीज
जिल्ह्यात एकूण 112 गॅस वितरक आहेत. त्यामध्ये भारत पेट्रोलियम 34, हिंदुस्थान पेट्रोलियम 54, इंडियन ऑईलचे 24 वितरक आहेत; तर सुमारे 9 लाख ते साडेनऊ लाख ग्राहक आहेत. केवायसी केल्याशिवाय गॅस सिलिंडर देऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे केवायसी असल्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही.