कोल्हापूर : ‘तुमच्या प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सर होऊन आमची माणसं मरत आहेत’ या आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्यावर इचलकरंजीतील प्रोसेसधारकाने ‘आमच्याही एका १७ वर्षीय मुलीला कॅन्सर झाला, त्यातच तिचा मृत्यू झाला. तुम्ही प्रचंड रासायनिक खते वापरता, त्यामुळे तुमच्या भाजीपाल्यामुळे आमच्याही लोकांना कॅन्सर झाला, असे आम्ही म्हणायचे का?’ असे प्रतिवक्तव्य केल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी बैठकीनंतर राडा झाला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पंचगंगा प्रदूषण आंदोलनाला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक वळण लागले. आंदोलन आणि प्रोसेसधारक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांनाही पांगवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोल्हापूर : प्रोसेस युनीटमधील पाणी विना प्रक्रिया पंचगंगेत मिसळते का नाही, याबाबतचे वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण तत्काळ करा आणि शुक्रवारी (दि.२६) त्याचा अहवाल सादर करा. यामध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. याप्रकरणी योग्य कार्यवाही होत नसल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पुन्हा आंदोलक आणि प्रोसेसधारकांत बैठक झाली. प्रोसेसमधील सांडपाणी विना प्रक्रिया नदीत जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शेतीला दिले जात असल्याचे प्रोसेसधारकांनी सांगितले. १०६ एकरचा सर्व्हे झाला आहे. त्यापैकी ९४ एकरमध्ये पाईपलाईन टाकली आहे. त्यावर संतप्त आंदोलकांनी कोणत्या शेतात पाणी सोडता ते शेत आम्हाला दाखवाच, अशी भूमिका घेतली. प्रोसेस कंपन्यांनी सांगितलेल्या जमिनीपैकी प्रत्यक्ष फक्त ५३ एकर जमीन पाणी सोडण्यायोग्य असल्याचा अहवाल प्रदूषण मंडळाने सादर केला. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. आमदार राहुल आवाडे या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत पंचगंगा प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजनांवरून दावे-प्रतिदावे करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याप्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना धक्काबुक्कीही केली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत दोन्ही बाजूला लोकांना पांगवले. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष काळाओढा येथे जाऊन वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करा, त्याचा अहवाल शुक्रवारपर्यंत द्या, प्रोसेसमधून थेट पाणी ओढ्यात जात असेल तर तत्काळ कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी एमपीसीबीला दिले. यावेळी आ. राहुल आवाडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, इचलकरंजीचे प्रांत अधिकारी दीपक शिंदे, इचलकरंजीचे तहसीलदार महेश खिलारी, ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, विश्वास बालिघाटे, नागेश काळे, दीपक पाटील, राकेश जगदाळे आदी उपस्थित होते.