कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एकीकडे ऑनलाईन सेवा करून लर्निंग लायसनही घरबसल्या मिळण्याची सोय केली; मात्र वाढते अपघात पाहता ड्रायव्हिंग लायसनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरटीओ कार्यालयापेक्षा गावोगावी होणारे कॅम्प अशा अपघाताने चर्चेत आले आहेत. या कॅम्पमध्ये ना संगणक चाचणी, ना परफेक्ट ड्रायव्हिंग चाचणी असा कारभार होत असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे.
सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी आरटीओ कार्यालयात कॅम्पपेक्षा गर्दी कमी असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात विविध गावांत दरमहा सुमारे 40 हून अधिक कॅम्प होतात. मुळात या कॅम्पमध्ये ‘लर्निंग’साठी संगणक आणि एमडीएलसाठी आठ आकडा व एच अक्षराच्या चाचणीची सोय नसते. कार्यालयात संगणकावर चाचणी घेऊन उमेदवारांना लर्निंग लायसन दिले जाते. दहा गुणांची परीक्षा घेतली जाते. चारचाकी व दुचाकीसाठी आठ आकडा पूर्ण करून एच अक्षरावरून वाहन चालविण्याची परीक्षा घेतली जाते. यामध्ये आठ आकडा किंवा आठ अक्षराच्या काठास जरा स्पर्श झाल्यास उमेदवार नापास केला जातो. त्यानंतर त्यास पुन्हा परीक्षा द्यावी लागते. कॅम्पमध्ये मात्र यातील काहीच होताना दिसत नाही.
केवळ उमेदवारांच्या सह्या घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना गावोगावी होणारे कॅम्प मात्र अधिकार्यांसह नागरीकांचेही आकर्षण ठरत आहे. कारण, अधिकार्यांना लर्निंगमध्येही अर्निंग होते. नागरिकांना विनापरीक्षा लायसन मिळते. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार सुरू आहे. मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक वाहन निरीक्षकांमार्फत होणारे हे कॅम्प आता चर्चेचे विषय बनले आहेत. जिल्ह्यात दोन कार्यालये असताना 40 हून अधिक कॅम्प कशासाठी, असा प्रश्न केला जात आहे. एवढेच नाही, तर कॅम्पमध्ये एक तालुक्यातील उमेदवारांना दुसर्या तालुक्यात लायसन देण्याचा प्रकारही चर्चेत आहे.
एवढे कॅम्प कुणासाठी व कशासाठी?
जिल्ह्यात आता कार्यालयीन सोय असताना आणि जिल्ह्यात 12 तालुके असताना तब्बल 40 हून अधिक कॅम्प का आणि कुणासाठी, असा प्रश्न केला जात आहे. या कॅम्पमागील सूत्रधार कोण, अशी विचारणा केली जात आहे.