कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात विरोधात असूनही जिल्ह्यात गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणावरून सातत्याने चर्चेत असलेल्या सतेज पाटील यांच्यासोबतची मैत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीत अखेर तोडली आहे. आमच्या मैत्रीची दोरी तुटली, असे सांगत सतेज पाटील यांना विरोधी पक्ष नेतेपद न मिळणे हे दुर्दैव असल्याचा टोलाही त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही, ठरला की कळवू, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. विधान परिषदेत काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे नाव चर्चेत होते, याबाबत विचारता मुश्रीफ यांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद न मिळणे हे त्यांचे दुर्दैव असल्याचे सांगितले.
कोल्हापूर महापालिकेत भाजप 31, शिवसेना 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागेचा फॉर्म्युला चर्चेत आहे, याबाबत विचारता मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, ठरला की तुम्हाला कळवूच, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, महापालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही गेली 25 वर्षे आहोत. आमच्या पक्षाचे डझनभर महापौर, उपमहापौर झाले. स्थायी समिती सभापती सर्वाधिक आमच्याच पक्षाचे झाले. शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 40 जागा घ्याव्यात, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. महापालिकेत 25 पेक्षा अधिक जागा मिळायला पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. इतक्या जागा मिळाल्या नाही तर काय करणार असे विचारता, जागा मिळाल्या नाही तर काय करायचे हे आता कशाला सांगू असे सांगत मुश्रीफ म्हणाले, आता मोठा भाऊ भाजप आहे. त्यांनी जनसुराज्यला निमंत्रण द्यायचे आहे, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.
1. आता भाजप आमचा मोठा भाऊ
2. जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही
3. महापालिका सत्तेत आम्ही गेली 25 वर्षे आहोत