कोल्हापूर : धारदार कोयत्याच्या धाकाने मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसवर दरोडा घालून 1 कोटी 22 लाख रुपये किमतीची 60 किलो चांदी आणि सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी पर्दाफाश केला. मुख्य सूत्रधार अक्षय बाबासाहेब कदम (32, रा. तिसरा बस थांबा, विक्रमनगर कोल्हापूर) याच्यासह 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. टोळीकडून लुटलेल्या चांदीसह दागिने हस्तगत करण्यात आले. पथकाने टोळीला टीप देणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वाहकाच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाका ते वाठारदरम्यान सोमवारी रात्री उशिरा दरोड्याचा थरार घडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह वडगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत दरोड्याचा छडा लावून टोळीला जेरबंद केले. मुख्य सूत्रधार अक्षय कदम याच्या विक्रमनगर येथील घरावर सकाळी छापा टाकून 60 किलो चांदीसह सोन्याचे दागिने व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
अटक केलेल्यांत अक्षय कदमसह जैद बशीर अफगाणी (21, रा. मदिना कॉलनी, उचगाव, ता. करवीर), अमन लियाकत सय्यद (21, दुसरा बस थांबा, विक्रमनगर कोल्हापूर), सुजल प्रताप चौगुले (20), आदेश अरविंद कांबळे (19), आदिनाथ संतोष विपते (25, सर्व रा. आकाशवाणी रोड, सांगली), ट्रॅव्हल्स वाहक सैफू बशीर अफगाणी (25, मदिना कॉलनी उचगाव, ता. करवीर) यांचा समावेश आहे. अटक केलेल्या संशयितांशिवाय आणखी काही साथीदारांचा दरोड्याचा गुन्ह्यात समावेश असावा, असा संशय पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.
पोलिसी खाक्या दाखविताच म्होरक्यासह टोळीतील साथीदारांनी दरोड्याची कबुली दिली. ट्रॅव्हल्सचा वाहक सैफू अफगाणी याने त्याचा सख्खा भाऊ जैद अफगाणीला टीप दिल्यानंतर टोळीने पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाका ते वाठार मार्गावर बसवर दरोडा टाकून सोने-चांदीचे दागिने लुटण्याचा कट रचल्याचे उघडकीला आले आहे.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, कोल्हापूर येथील न्यू अंगडिया सर्व्हिस कंपनीच्या पार्सलची अशोका ट्रॅव्हल्सच्या बसमधून ने-आण होत असते. सराफ व्यावसायिकांचा किमती ऐवजही याच बसमधून नेला जात असल्याची माहिती ट्रॅव्हल्सचा वाहक सैफू अफगाणी याला होती. ट्रॅव्हल्समधून नियमित होणाऱ्या उलाढालीची माहिती भाऊ जैद अफगाणी याला दिली.
कोल्हापुरात ठरला दरोड्याचा कट
जैद याने टोळीचा म्होरक्या अक्षय कदमला माहिती देऊन ट्रॅव्हल्सवर दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यासाठी कोल्हापूरसह सांगलीतील तिघा साथीदारांना कोल्हापूरला बोलावून घेतले. टोळीतील काही साथीदार ट्रॅव्हल्समधून प्रवास करायचे अन् उर्वरित साथीदारांनी दुचाकीवरून ट्रॅव्हल्सचा पाठलाग करण्याचा असा त्याचा बेत ठरला.
किणी टोल नाका पास झाल्यानंतर सूत्रधाराने काढला कोयता
सोमवारी रात्री तावडे हॉटेलजवळ ट्रॅव्हल्स थांबली. अक्षय कदमसह जैद अफगाणी व आणखी एक साथीदार बसमध्ये चढले. रात्री 11 वाजता बसने किणी टोल नाका पास केल्यानंतर वाठारजवळ अक्षय कदम, जैद अफगाणीसह तिघांनी शॅकमधील कोयता काढला. वाहक सैफू अफगाणी याच्या गळ्याभोवती कोयता लावण्याचे त्यांनी नाटक केले. त्यानंतर चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महामार्गावर बस रोखण्यात आली.
प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी
बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी दिली. चालक-वाहकाने बसची डिकी उघडून पोत्यातील चांदीच्या विटा, तयार दागिने काढून दिल्यानंतर दरोडेखोर दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाले. चालकाने वाठार येथे गेल्यानंतर वडगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधून दरोड्याची माहिती दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल
मुंबई-बंगळूर महामार्गावर ट्रॅव्हल्स रोखून दरोड्याचा प्रकार घडल्याने पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सुशांत चव्हाण, सागर वाघ, संतोष गळवे, जालिंदर जाधव यांच्यासह पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्यासह वडगाव, हातकणंगले व जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
बस वाहकाच्या जबाबात विसंगती
तावडे हॉटेल ते किणी टोल नाका, वाठारदरम्यान महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. ट्रॅव्हल्सचा वाहक सैफू अफगाणी याच्या जबाबात विसंगती आढळून आल्या. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, सुशांत चव्हाण यांच्यासह पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर टोळीचा भांडाफोड झाला.
विक्रमनगरातून चांदी जप्त
सूत्रधार अक्षय कदम याच्यासह टोळीतील साथीदारांचीही नावे निष्पन्न होताच पथकाने छापे टाकून 7 संशयिताना ताब्यात घेतले. अक्षय कदम याच्या विक्रमनगर येथील घरावर छापा टाकून 60 किलो चांदीसह सोन्याचे दागिने असा 1 कोटी 22लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चैनीसह कर्जबाजारीपणातून दरोड्याचा प्लॅन
दरोड्यातील टोळीचा सूत्रधार अक्षय कदमसह त्याचे सातही साथीदार प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. चौकशीत टोळीचे एकेक कारनामे उघडकीला येण्याची शक्यता आहे. असेही पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले. केवळ चैनी आणि कर्जबाजारीपणामुळे टोळीने दरोड्याचा कट रचल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून पुढे आली आहे. टोळीची सखोल चौकशी होईल, असेही अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.