टोप : टोप (ता. हातकणंगले) येथे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या कुटुंबीयांच्या तोंडावर गुंगी आणणारा स्प्रे फवारून चोरी करून पोबारा केला.
शोकेसमधील 16 ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, सोन्याची ठुशी, दोन चांदीच्या कड्या, तीन मोबाईल हँडसेट तसेच 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 21 हजार 295 रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वैभव पाटील यांचे आजोबा पहाटे लघुशंकेसाठी उठले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. कुटुंबीयांना हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वैभव यांना जागे केले. कपाटातील वस्तू विखुरलेल्या अवस्थेत दिसल्याने घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे घरातील व शेजारील पाळीव श्वानही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून श्वानपथकाची मदत घेण्यात आली. मात्र श्वान घटनास्थळाच्या आसपासच घुटमळल्याने चोरट्यांनी वाहनाचा वापर करून पलायन केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.