राजेंद्र जोशी
कोल्हापूर : कोल्हापुरात वाहनांची संख्या शहराच्या लोकसंख्येशी स्पर्धा करून पुढे गेली आहे. यामुळे शहरातील रस्ते गर्दीत हरवून गेले आहेत. परिणामी पादचार्यांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालणे भाग पडते. या वाहतुकीचा पूर विरळ करण्यासाठी शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची उभारणी अत्यावश्यक ठरली आहे.
उड्डाणपुलांच्या उभारणीची आवश्यकता गेल्या वीसएक वर्षांपासून चर्चिली जात होती. दोन दशकानंतरही त्यामध्ये शून्य प्रगती आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील उड्डाणपुलांच्या उभारणीविषयी कृती करणार की केवळ चर्चेचा फड रंगविणार, असा सवाल निर्माण झाला आहे.
कोल्हापूर शहर हे आजूबाजूच्या परिसरातील शिक्षणाचे, व्यापार उद्योगाचे केंद्र आहे. तसेच तीर्थक्षेत्र म्हणूनही त्याची देशभर ख्याती आहे. यामुळे या शहरात दररोज बाहेरून येणार्या वाहनांची संख्या हजारोंवर असते. शिवाय शहरातच 5 लाखांहून अधिक वाहने आहेत. ही वाहने रस्त्यावर आली की, रस्त्यावर वाहनांचा पूर तयार होतो. त्यातही या वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे मुळातच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद होतात आणि मग वाहनधारकांसह नागरिकांची कसरत सुरू होते. यावर महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या 9 सार्वत्रिक निवडणुकांमधून आकारास आलेल्या सभागृहात कोणताही मूलभूत फरक करणारा निर्णय झाला नाही. परिणामी आज कोल्हापूरकर वाहनांच्या पुराची शिक्षा भोगतो आहे.
टेंबलाई रेल्वे फाटकाजवळ आणि शाहू नाक्याजवळ असे दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. हे दोनही उड्डाणपूल शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीचे बांधण्यात आले. यातील शाहू नाक्याजवळील उड्डाणपूल आता पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. याखेरीज ताराराणी चौकातून तोरस्कर चौकापर्यंत एक मोठा उड्डाणपूल बांधण्याची चर्चा करीत राज्यकर्त्यांनी दोन निवडणुका पार पडल्या. या मोठ्या उड्डाणपुलाला मध्यवर्ती बस स्थानक - राजारामपुरी, ताराबाई पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय, बिंदू चौक असे फाटे दिले तर वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकतो. याखेरीज कोल्हापूर शहरात प्रवेश करणार्या रस्त्यांवरही आता उड्डाणपूल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. पण बास्केट ब्रीज अद्याप कागदावर आहे.
सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शहराच्या प्रमुख मार्गांवर अक्षरशः वाहनांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतात. तीर्थक्षेत्र विकासाच्या घोषणा जरूर होत आहेत. पण पायाभूत सुविधांअभावी त्या पोकळ ठरत आहेत. आता केवळ चर्चांवर समाधान मानायचे की ठोस कृतीची अपेक्षा करायची, हा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे. (पूर्वार्ध)